Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचं धक्कादायक एलिमिनेशन नुकतंच पार पडलं आहे. यंदाच्या या पर्वात धक्कादायक एलिमिनेशन झालं त्यात अरबाज पटेलची एक्झिट झालेली पाहायला मिळाली. घरातून आठव्या आठवड्यात अरबाज पटेलने एक्झिट घेतली आहे. घरात नॉमिनेट असलेल्या सदस्यांपेक्षा सर्वात कमी मतं मिळाल्याने त्याला ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे. या धक्कदायक एलिमिनेशनमुळे साऱ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. अरबाजच्या जाण्याने घरातील सदस्यांनाही अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. अरबाजच्या जाण्याने विशेषतः फरक पडला तो म्हणजे निक्की तांबोळीला.
निक्की तांबोळी व अरबाज पटेल यांची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एक वेगळंच नातं पाहायला मिळालं. निक्की व अरबाज यांच्यातील मैत्रीचं नातं कालांतराने प्रेमात फुलताना दिसलं. अरबाजच्या जाण्याने निक्की ढसाढसा रडताना दिसली शिवाय ती आता एकटी पडली असल्याचंही दिसत आहे. ‘जंगलराज’ थीममध्ये ‘शिकाऱ्याची बंदूक’ हे नॉमिनेशन कार्य पार पडलं यावेळी कार्यात अरबाज, जान्हवी, वर्षा, निक्की, सूरज असे पाच सदस्य घरातून बेघर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते.
सर्वात कमी व्होट्स मिळाल्याने अरबाजला ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घ्यावी लागली आहे. अरबाज एलिमिनेट झाल्याचं जाहीर होताच निक्की ढसाढसा रडू लागल्याचं पाहायला मिळालं. मात्र अरबाजची या घरातील एक्झिट काहींना खटकली असल्याचं दिसत आहे. अनेकांनी अरबाज ऐवजी निक्की जायला हवी होती असं म्हणत निक्कीला खडेबोल लगावले आहेत. ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी पोस्ट शेअर करत अरबाज ऐवजी निक्की जायला हवी होती असं म्हणत थेट पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा – महाराष्ट्राचे ‘भूषण’ आता छोटा पडदा गाजवणार! अशोक सराफ यांची नवीन मालिका, भूमिका आहे फारच खास
“अरबाज घराबाहेर पडल्याचा आनंद बऱ्याच लोकांना झाला असला तरी मला वाटतं निक्की जायला हवी होती. निक्की फक्त अरबाजच्या जीवावर नाचत होती. अरबाज चांगला खेळत होता. राग, चिडचिड हे सगळं त्या घरात होतंच पण तो चुकला ते निक्कीच्या नादी लागून”, असं कॅप्शन देत त्यांनी “अरबाजच जाणं योग्य आहे का ?”, असं म्हणत थेट प्रेक्षकांना सवाल केला आहे. सदर पोस्टवर अनेकांनी सहमती दर्शविलेली पाहायला मिळत आहे.