मालिका म्हटल्या की त्यातील प्रमुख नायिका या लोकप्रिय होतातच. पण अनेकदा या मालिकांमधील खलनायिकाही तितक्याच गाजतात. बऱ्याचदा मालिकेतील खलनायिका नायिकांवर भारी पडतात. मराठी मालिका विश्वातील अशा अनेक लोकप्रिय खलनायिकांपैकी एक खलनायिका म्हणजे पूजा पवार. ‘कारभारी लयभारी’ या झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत राजवीर आणि पियू यांची गावरान प्रेमकहाणी चांगलीच गाजली. मात्र या दोघांइतकेच त्यांच्या प्रेमकहाणीत खोडा घालणारे खलनायकही तितकेच गाजले. या मालिकेतली काकीसाहेब ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि ही भूमिका अभिनेत्री पूजा पवार यांनी साकारली होती. (Pooja Pawar Fan Story)
पूजा पवार यांच्या ‘कारभारी लयभारी’ भूमिकेतील काकीसाहेब या भूमिकेचा प्रेक्षकांनाही खूपच राग यायचा. पूजा पवारांची काकीसाहेब ही भूमिका इतकी गाजली की, प्रेक्षक आपल्याला मारतील की काय? अशी भीती त्यांना वाटायची. याबद्दल पूजा पवारांनी ‘इट्स मज्जा’च्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. याबद्दल त्यांनी असं म्हटलं की, “‘कारभारी लयभारी’ मालिकेत मी काकीसाहेब हे पात्र केलं होतं. धुरंदर, कपटी राजकारणी खलनायिका अशी ती भूमिका होती. माझी ती भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. मी नकारात्मक भूमिका करु शकेन असं मला वाटलं नव्हतं. तेजपाल वाघची ती मालिका होती. तेव्हा तो मला म्हणाला होता की तुम्ही ही भूमिका चांगली कराल. ही भूमिका खूप गाजेल आणि तसंच झालं”.
आणखी वाचा – Video : पारंपरिक अंदाजात स्वागत, ओवाळलं अन्…; डिपीच्या घरात इरिनाचा थाटामाटात पाहुणचार, व्हिडीओ व्हायरल
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “तेव्हा बायका मला काय काय म्हणायच्या… आम्ही आकलूजला शूटिंग करत होतो. साखर कारखाना किंवा रस्त्यावर वगैरे आम्ही शूटला गेलो की, बायका मागून काय काय बोलत असायच्या. ही बघा आली. धरा हिला… मारा हिला… असं काय काय म्हणायच्या… ही एक प्रकारची माझ्या भूमिकेला दाद होती. पण मला त्यांची भीतीही वाटायची. खरं सांगायचं तर मला नकारात्मक भूमिकांपेक्षा सकारात्मक भूमिका कारायला जास्त आवडतं”.
आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : जहागीरदारांचं घर सोडून गेली लीला, ऐजेंना येत आहे आठवण, पुन्हा परतणार का?
दरम्यान, पूजा पवार यांनी ‘खिलौना बना खलनायक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्येही पाय ठेवला. विवाहानंतर पूजा पवार यांची पूजा साळुंखे झाली. लग्न, मुलीच्या संगोपनामुळे पूजा यांनी मनोरंजन विश्वापासून लांब राहणं पसंत केलं. त्यानंतर काही वर्षांच्या ब्रेकनंतर त्यांची पावलं पुन्हा मनोरंजन विश्वाकडे वळली. मग त्यांनी ‘बापमाणूस’, ‘आई कुठे काय करते’, ‘कारभारी लयभारी’ अशा मालिकेत काम केले आहे.