Sushant Shelar On Santosh Juvekar : ‘छावा’ चित्रपटातील भूमिकेमुळे मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. संतोषने अनेक मुलाखतींमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे तो ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकला. संतोषने केलेलं वक्तव्य अत्यंत बालिश असल्याचं म्हणत नेटकरी अजूनही त्याला ट्रोल करत आहेत. त्याचे अनेक व्हिडीओ, मिम्स तुफान व्हायरल होत आहेत. अशातच त्याच्या चाहत्यांनी आणि कलाकार मित्रांनी संतोषला त्याच्या या ट्रोलिंगसारख्या अडचणीच्या काळात त्याला पाठिंबा दिला आहे. संतोषने या ट्रोलिंगवर भाष्य करताच काही कलाकार मंडळींनीही त्याला पाठिंबा दर्शविणारी पोस्ट शेअर केली आहे.
गायक अवधूत गुप्ते, ‘बिग बॉस मराठी ५’ फेम धनंजय पोवार आणि अभिनेत्री रुचिरा जाधव या कलाकार मंडळींनी संतोषला पाठिंबा देत खास पोस्ट शेअर केल्या. यापाठोपाठ आता अभिनेता सुशांत शेलारनेसुद्धा संतोषच्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुशांतने सोशल मीडियावर संतोषबरोबरचा खास फोटो पोस्ट करत त्याला सपोर्ट करणारी पोस्ट केली आहे.
संतोष जुवेकरसाठी सुशांत शेलारची खास पोस्ट
“खरं सांगायचं तर, आजकाल एखाद्याने प्रामाणिकपणे आपली मतं मांडली, की लगेच काही लोक ट्रोलिंगच्या मागे लागतात. आणि जेव्हा आपला एखादा खास मित्र अशा गोष्टींचा सामना करत असतो तेव्हा मन हेलावून जातं. संतोष जुवेकर हा फक्त एक अभिनेता नाही, तर आपल्या भूमिकांमधून जनतेच्या मनात घर करणारा संवेदनशील कलाकार आहे. त्याने समाजप्रवाहात झोकून दिलेलं योगदान आणि त्याचा स्पष्टवक्तेपणा हीच त्याची खरी ताकद आहे. पण दुर्दैवाने, काही लोक ही ताकद दुर्बलता समजतात आणि जाणीवपूर्वक त्याला लक्ष्य करत आहेत”.
“मित्रा संतोष, हे सगळं तू पाहूनसुद्धा शांत आहेस, कारण तुला माहीत आहे – वेळच खरं उत्तर देते. पण तरीही, एक खरा मित्र म्हणून मला आज तुला एक गोष्ट सांगावीशी वाटते. या ट्रोलिंगमागं आहे द्वेष, असुरक्षितता, पण तुझ्या मागे आहे प्रेम, आदर आणि माणुसकी. तू केलेल्या अशा कितीतरी भूमिकेत तु लोकांना प्रेरणा दिलीस त्यांची साथ आज तुझ्याबरोबर आहेच. आणि आम्ही सुद्धा पूर्ण ताकदीनं, मनापासून. दुरुन आवाज करणाऱ्यांना सोडून दे कारण ते कधीच आपल्या जवळ येत नसतात. संतोष, तू खंबीर उभा राहा. तू एकटाच नाहीस आम्ही तुझ्याबरोबर आहोत”.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटामुळे संतोष जुवेकर चर्चेत आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफीवर कमाईचे अनेक विक्रम केले आहेत. या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्नासारख्या बॉलीवूड कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.