मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांना मराठीतील लोकप्रिय जोडपे म्हणून ओळखले जाते. दोघांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघेही बरेचदा सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. कामातून वेळ मिळाल्यावर दोघेही वेगवेगळ्या देशांना भेट देऊन तेथील आठवणी शेअर करत असतात. मिताली-सिद्धार्थ दोघेही बरेच वर्षे एकमेकांना डेट करत होते आणि मग त्यांनी लग्न केले. गेल्या काही दिवसांपासून दोघे चर्चेत आहेत आणि या चर्चांचं कारण म्हणजे दोघांनी मिळून पहिल्यांदाच एकत्र करत असेलला चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’. या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघंही पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. (siddharth chandekar appreciate mitali mayekar)
नव्या वर्षात या दोघांनीही चाहत्यांना आनंदाची बातमी देत त्यांच्या ‘फसक्लास दाभाडे’ या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली. सिद्धार्थ-मितालीचा ‘फसक्लास दाभाडे’ हा एकत्र पहिला चित्रपट त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसालाच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे या जोडप्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अशातच आजच्या या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थने मितालीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थने मितालीबरोबरचा रोमॅंटिक फोटो शेअर करत तिचं या चित्रपटातील कामानिमित्त कौतुक केलं आहे. त्याचबरोबर तिला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा – 24 January Horoscope : वृषभ, मिथुन व कन्या राशीच्या लोकांना शुक्रवारी मिळणार भाग्याची साथ, जाणून घ्या…
या पोस्टमध्ये सिद्धार्थने असं म्हटलं आहे की, “बायको! आज आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला दोघांचा पहिला चित्रपट प्रदर्शित होत आहे. किती भारी! मी कायम तुझी अभिनय करण्याची भूक, धडपड आणि तडफड पाहत आलो आहे. मला कायमच तुझा अभिमान होता, पण तुझं हे काम बघून तर मला जरा जास्तच अभिमान वाटत आहे. तू एक सुंदर अभिनेत्री आहेस, आणि तू आईशप्पथ कडक काम केलं आहेस. तुझ्याकडे इतकं यश येवो, इतकं ऐश्वर्य येवो की, तुला मागे वळून बघायची गरजच भासणार नाही. मी नेहमीसारखा खंबीरपणे तुझ्यामागे उभा आहे. तू लढ! बाकी तेरा आदमी देख लेगा! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!”
आणखी वाचा – Oscar Nominations : ९७ व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकने जाहीर, प्रियांका चोप्राचा ‘हा’ चित्रपटही शर्यतीत
दरम्यान, सिद्धार्थने शेअर केलेल्या या पोस्टखाली अनेक कलाकारांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हेमल इंगळे, क्षिती जोग, हेमंत ढोमे, आदर्श शिंदेसह अनेक कलाकारांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय त्यांच्या ‘फसक्लास दाभाडे’ या पहिल्या एकत्र चित्रपटासाठीदेखील शुभेच्छा दिल्या आहेत आणि दोघांचे कौतुक केले आहे.