सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘धर्मवीर २’ या चित्रपटाची. स्व.आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कल्ला केला. आता या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. २७ सप्टेंबरला ‘धर्मवीर २’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार होता मात्र पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्यात आलं. या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते मंगेश देसाई यांनी अनेक किस्से सांगितलेले पाहायला मिळाले. चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओक साकारत निर्माते म्हणून मंगेश देसाई बाजू सांभाळत आहेत. (mangesh desai reveals anand dighe story)
अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी निर्माते मंगेश देसाई यांची ‘बोल भिडू’ या यूट्यूब चॅनेलसाठी मुलाखत घेतली. चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते मंगेश देसाई यांनी आनंद दिघेंचा एक किस्सा सांगितला आहे. मंगेश देसाई म्हणाले, “पहिला भाग जेव्हा आम्ही केला, तो साडेचार तासांचा झाला. आणखी इतके प्रसंग आहेत की, ते चित्रपटात दाखवायचे राहिले आहेत. एक प्रसंग सांगतो, इतका इंटरेस्टिंग किस्सा आहे. आता कसा दाखवायचा हे चाललं होतं; पण ते नॅरेशनमध्ये बसतं नव्हतं”.
पुढे ते म्हणाले, “साहेबांना भेटायला एक अत्यंत सुंदर स्त्री यायची. साहेबांच्या रुममध्ये जायची. साहेब त्या महिलेशी गप्पा मारत आहेत हे सगळे बघत असायचे. काय बोलतात काहीच माहीत नाही. ती साहेबांना नमस्कार करायची आणि निघून जायची. उत्सुकता म्हणून सगळ्यांनी चौकशी करायला सुरुवात केली ही महिला आहे तरी कोण? आणि साहेबांना महिन्यातून एकदा येऊन का भेटते? शोधाशोध झाल्यावर लक्षात आलं की, ही महिला एका लेडीज बारमध्ये काम करणारी आहे”.
आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : क्रुझवर लीला प्रेमाची कबुली देणार, ऐजेंबरोबरचं प्रेम आणखीनच बहरणार, डान्स, प्रपोझ अन्…
पुढे मंगेश देसाई किस्सा सांगत म्हणाले, “लेडीज बारमध्ये काम करणारी बाई साहेबांना का भेटायला येते? असा प्रश्न पडला. तर ती साहेबांना हे सांगायला यायची की, तिथे कोण कोण गँगस्टर येतात, ते काय काय चर्चा करतात, यासंबंधीच्या त्यांच्या चर्चेतून ठाण्याला, तेथील लोकांना काही इजा आहे का? हे समजायचे. ती त्यांची खबरी होती. हा इंटरेस्टिंग सीन होऊ शकतो पण कथेच्या लांबीनुसार तो आम्हाला करता आला नाही”.