mahesh manjrekar first wife passed away : अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी दीपा मेहता यांचे निधन झाले आहे. २५ सप्टेंबर रोजी दीपा यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अशा अचानक निधनाने साऱ्यांनाच धक्का बसला आहे. तर त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने सोशल मीडियावर दु:ख व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. आईच्या आठवणीत एक फोटो सत्याने शेअर केला असून, दीपा यांच्याविषयी इतर काही जवळच्या व्यक्तींनीही शेअर केलेल्या पोस्टही त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर रीपोस्ट केल्या आहेत. दीपा यांचा एक जुना फोटो शेअर करत सत्याने ‘आय मिस यु मम्मा’असे लिहिले आहे.
दीपा यांच्याविषयी सांगायचे झाल्यास त्या एक प्रसिद्ध कॉस्ट्युम डिझायनर होत्या. त्याचा ‘क्वीन ऑफ हार्ट्स’ हा साड्यांचा ब्रँड विशेष लोकप्रिय आहे. कलाविश्वातील मंडळींमध्येही त्यांचा हा ब्रँड विशेष लोकप्रिय आहे. दीपा यांच्या निधनानंंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हळहळ व्यक्त केली. ‘बिग बॉस मराठी 5’ फेम कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर हिनेही या घटनेविषयी शोक व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली. ‘एक मार्गदर्शक हरवला… त्या एका आईपेक्षा खूप काही होत्या, त्या एक प्रेरणा होत्या. त्यांचे सामर्थ्य, धैर्य आणि साड्यांच्या स्वत:च्या व्यवसायाची निर्मिती करण्याची आवड अनेक मुलींना मोठी स्वप्न पाहण्यासाठी प्रेरणा देणारी ठरली”. अंकिताने त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली, तर सत्याप्रती संवेदनाही व्यक्त केल्या.

दीपा आणि महेश यांचे लग्न १९८७ साली झाले होते. त्यांना दोन मुले आहेत सत्या आणि अश्वमी. घटस्फोटानंतर दोन्ही मुले दीपा यांच्याबरोबर राहत होती, तरी वडिलांशी असलेलं त्यांचं नातं कधीच तुटले नाही. घटस्फोटानंतर महेश यांनी दुसरे लग्न केले, आणि त्यांची दुसरी पत्नी अभिनेत्री मेधा मांजरेकर आहेत.





