कोरोना संसर्गाच्या काळात अनेकांना त्यांच्या प्रियजनांना गमावण्याची वेळ आली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्यावरही असाच एक दुःखद प्रसंग ओढावला होता. कोरोनाशी झुंज देताना अश्विनीचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे निधन झाले होते. “कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला” अशा शब्दात अश्विनीने फेसबुकवरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती.
यानंतर वेळोवेळी अभिनेत्रीने तिच्या वडिलांविषयीची आठवण व्यक्त केली असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. अशातच आज अश्विनीच्या वडिलांचे निधन होऊन तीन वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्ताने पुन्हा एकदा अश्विनीने तिच्या वडिलांची आठवण काढत त्यांच्याविषयीची एक पोस्ट शेअर केली आहे. अश्विनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे वडिलांचा एक फोटो शेअर केला असून या फोटोसह तिने वडिलांविषयी आठवणही काढली आहे.
अश्विनीने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “बघता बघता ३ वर्ष निघून गेली त्यांच्याशिवाय. बरेच आनंदाचे क्षण, दुःख, घेतलेल्या वस्तू, माझे पहिले घर हा सगळा प्रवास त्यांच्याशिवाय करावा लागला. पण या सगळ्यात माझ्या विचारात आणि माझ्यात ते कायम आहेत आणि यापुढेही राहतील. असा बापमाणूस मिळायला भाग्य लागतं. त्यांच्या शेवटच्या काही दिवसांत त्यांनी आमच्यासाठी पाहिलेली स्वप्न मला सांगितली आणि ती मी नक्की पूर्ण करेन”.
वडिलांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणदिनानिमित्त अश्विनीने ही पोस्ट शेअर केली असून तिच्या अनेक चाहत्यांनी या पोस्टखाली अभिनेत्रीच्या वडिलांना आदरांजली वाहिली आहे. दरम्यान, अश्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या आई कुठे काय करते या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे.