आजच्या काळात रोमान्स, सासू-सुनेचे भांडण, ॲक्शन आणि थ्रिलरबरोबरच हॉरर कंटेंटची क्रेझही झपाट्याने वाढत आहे. सोशल मीडियाद्वारे लोकांना भयपट पाहणेदेखील तितकेच आवडते. इतकंच नाही तर आजच्या जगात अनेक भयपट आणि टीव्ही शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मात्र ९० च्या दशकात आलेल्या ‘आहट’ला कोणताही हॉरर शो टक्कर देऊ शकत नाही किंवा या शोला मागे टाकू शकत नाही. जेव्हा जेव्हा आपण हॉरर शोबद्दल बोलतो तेव्हा लोकांच्या ओठावर पहिले नाव येते ते या ‘आहट’ शोचे. या शोने केवळ एक-दोन, नव्हे तर तब्बल २० वर्षे प्रेक्षकांना घाबरवले. (Aahat Horror Serial)
१९९४ मध्ये भयकथांची मालिका असलेला ‘आहट’ हा शो अल होता. ‘आहट’चे शीर्षक गीतही अत्यंत भीतीदायक होते. आजही ते शीर्षकगीत ऐकून अनेकजण घाबरतात. सोनी टीव्हीवर प्रसारित होणारी ही मालिका लोकांना खूप आवडली होती. हा पहिला हॉरर शो होता ज्यामध्ये कॉम्प्युटर ग्राफिक्स वापरण्यात आले होते. या मालिकेने पहिल्या दोन वर्षांत झी हॉरर शोला टक्कर दिली होती आणि पहिले स्थान पटकावले. त्यानंतर आता हा हॉरर शो पुन्हा एकदा प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी येणार आहे. सोनी मराठीवर ‘आहट’ हा हॉरर शो आता मराठीमध्ये प्रसारित केला जाणार आहे.
आणखी वाचा – 22 october Horoscope : मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात मिळणार यश, आर्थिक भरभराटीचे आहेत संकेत, जाणून घ्या…
सोनी मराठी वाहिनीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे ‘आहट’ या शोचा प्रोमो शेअर केला गेला असून “सगळीकडे पसरणार भीतीचे सावट, कारण येत आहे ‘आहट’! आता मराठीत” असं म्हटलं आहे. येत्या ८ नोव्हेंबरपासून ‘आहट’ हा हॉरर शो शुक्रवार ते रविवार रात्री १०.३० वाजता लागणार आहे. बीपी सिंग यांनी तयार केलेल्या या शोचे सर्व भाग एकमेकांपेक्षा चांगले होते. याशिवाय अनेक हॉरर शो सुरू झाले, पण या शोला कोणीही टक्कर देऊ शकले नाही. विशेष म्हणजे त्यावेळी हा शो एकट्याने पाहणे शक्य नव्हते.
अशातच हा शो आता मराठीमध्ये येणार असल्याने अनेक प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोनी मराठीने शेअर केलेल्या या नवीन प्रोमोखाली अनेकांनी तशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. “आहट, सीआयडी सारख्या जुन्या मालिका मराठीत सुरू होत आहेत ही चांगली गोष्ट आहे”, “ही मालिका पाहण्यासाठी लहानपणी आईचा मार खाल्ला होता”, “काय खर नाय… सोनी टीव्ही एकापेक्षा एक भारी मालिकांचा खजिना बाहेर काढते राव” अशा अनेक प्रतिक्रियांद्वारे प्रेक्षकांनी ‘आहट’ या शोविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे.