मराठी कला विश्वात सध्या सर्वत्र लग्नसोहळ्याचे वारे वाहू लागले आहेत. नुकतीच अभिनेत्री रेश्मा शिंदे पवनबरोबर लग्नबंधनात अकडली. तर अभिनेता शाल्व किंजवडेकर, अभिनेत्री शिवानी सोनार, यांचीही लग्नाची लगबग सुरु झाली आहे. या कलाकारांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. आगामी काळात ही कलाकार विवाहबंधनात अडकणार आहेत. अशातच आता ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील एक लोकप्रिय अभिनेत्रीही विवाहबंधनात अकडणार आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत ‘चंचला’ हे पात्र अभिनेत्री विरीशा नाईक साकारत आहे. खऱ्या आयुष्यात ही अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. याबाबत तिने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. (Virisha Naik Marriage)
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेत खलनायिकेच्या भूमिका साकारणार्या भुवनेश्वरी, दुर्गेश्वरी आणि चंचला या सुद्धा घराघरांत लोकप्रिय झाल्या आहेत. यापैकी चंचलाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे. १५ ऑगस्ट रोजी प्रशांत निगडे आणि विरिशा नाईक यांचा साखरपुडा पार पडला होता. आता डिसेंबर महिन्यात हे दोघे विवाहबद्ध होणार आहेत. विरीशाचा होणारा पती हादेखील एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे आणि त्याचे नाव प्रशांत निगडे असं आहे.
स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेत प्रशांत ‘रॉकेट’ची भूमिका साकारत आहे. मालिकेतील त्याचे हे पात्र मजेशीर असल्याने त्याची भूमिका लक्षवेधी ठरली आहे. याअगोदर प्रशांत निगडेने ‘स्वाभिमान’ मालिकेत बबनचे पात्र साकारले होते. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. आय एम पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ या नाटकात दोघांनी एकत्र काम केले आहे. या नायकाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीदेखील प्रशांत निगडेची आहे.
दरम्यान, दिवाळीत विरीशा व प्रशांत यांनी व्हिडीओ शेअर करत लवकरच लग्न करणार असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांचे अनेक चाहते मंडळी त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोघे डिसेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे. मात्र या दोघांनी त्यांच्या लग्नाची नेमकी तारीख अजून सांगितलेली नाही. त्यामुळे चाहते मंडळी या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत.