Vivek Oberoi New Home : विवेक ओबेरॉयने दिवाळीच्या मुहूर्तावर नवं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. विवेकने पत्नी प्रियांकासह नवीन घरात पूजा करतानाचा फोटोही शेअर केला आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पत्नी प्रियंकाबरोबर लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांनी स्वत:साठी हे आलिशान घर घेतले असल्याचं सांगितलं. विवेक ओबेरॉय आपल्या कुटुंबासह त्याच्या या नव्या घरात शिफ्ट झाला आहे. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी आपल्या नवीन घरात प्रवेश केल्याचे सांगितले. विवेकने पत्नीबरोबर घरातून धनत्रयोदशीच्या पूजेचा फोटो शेअर केला आहे.
या फोटोमध्ये दोघांनी पूजा केल्यानंतर, विवेक त्याची पत्नी प्रियांकाचे लाड करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना विवेक ओबेरॉयने एक सुंदर कॅप्शन लिहिले आहे. त्याने आपल्या पत्नीचे ‘घर’ असे वर्णन केले आहे आणि लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. विवेकने लिहिले आहे की, “१४ वर्षांपूर्वी, अग्नीभोवती फेऱ्या मारताना, मी माझ्या जोडीदारावर, माझ्या प्रियांकावर भरपूर प्रेमाची शपथ घेतली. आज धनत्रयोदशीच्या या शुभ दिवशी, आपण आपल्या वडिलांच्या आशीर्वादाने आपल्या सुंदर नवीन घरात प्रवेश करत असताना, मी देवाच्या कृतज्ञतेने भरुन जात आहे. या फॅन्सी भिंतींना तुमच्याशिवाय काहीच अर्थ नाही. माझ्यासाठी, तू माझे घर आहेस आणि तेच माझे हृदय आहे आणि नेहमीच असेल”.
आणखी वाचा – Video : नवऱ्यासह अंकिता वालावलकरने गाठलं कोल्हापूर, डीपीबरोबर कुटुंबाचीही घेतली भेट, व्हिडीओ व्हायरल
विवेक ओबेरॉयने प्रियंकाबरोबर २९ ऑक्टोबर २०१० रोजी बेंगळुरुमध्ये लग्न केले होते. आता विवेक व प्रियांका अल्वा हे विवान वीर व अमेय निर्वाण या दोन मुलांचे पालक झाले आहेत. एकेकाळी ऐश्वर्या राय विवेक ओबेरॉयच्या आयुष्यात होती. सलमान खानबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या विवेकच्या जवळ आली. असे म्हटले जाते की ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांचे अफेअर २००३ मध्ये सुरु झाले होते आणि ते २००५ पर्यंत चालू होते.
२००३ मध्ये आलेल्या ‘क्यों हो गया ना’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. सलमान खानने विवेकला धमकी दिल्यानंतर त्याने या नात्यातून काढता पाय घेतल्याचेही बोलले जात आहे. मात्र, विवेकने पत्रकार परिषद घेऊन सलमानकडून मिळालेल्या धमक्यांचा खुलासा केला होता.