Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा सीझन गाजतोय तो घरातील सदस्यांमुळे आणि या घरातील लक्षवेधी चेहरा म्हणजे सूरज चव्हाण. सूरजने आपल्या स्टाईलने प्रेक्षकांना चांगलच खिळवून ठेवलं आहे. त्याचा साधेपणा प्रेक्षकांना भावतो. त्याचं बिनधास्त वागणं प्रेक्षकांच्या व चाहत्यांच्या पसंतीस उतरलं. सुरुवातीपासून सूरजचा खेळ ही प्रत्येकाला आवडत आहे. त्याचप्रमाणे घरातले ज्याप्रमाणे त्याच्याशी वागत आहेत, त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. सूरजने त्याच्या प्रत्येक छोट्या छोट्या कृतींमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आणि याचे सर्वांनीच कौतुक केलं. (Abhijeet Kelkar On Suraj Chavan)
‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वात या सोशल मीडिया स्टारला का घेतलं? असा प्रश्न विचारणारे लाखो प्रेक्षक आताच्या घडीला सूरजचे कट्टर चाहते झाले आहेत. त्याची खेळी पाहून आणि त्याचा स्वभाव पाहून अनेकजण त्याच्याबद्दल आपपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत आणि त्याला पाठींबा देत आहेत. ‘बिग बॉस’च्या खेळात एवढा पुढे जाईल असं कोणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. पण त्याच्या इथपर्यंतच्या प्रवासाचा सर्वांनाच आनंद आहे. सूरजच्या अनेक चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनीही त्याला पाठिंबा दिला आहे.
अशातच अभिनेता अभिजीत केळकरने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये अभिजीतने सूरजविषयी असं म्हटलं आहे की, “जी संधी आणि आर्थिक-सामाजिक समानता ७५ वर्षांची आपली लोकशाही देऊ शकला नाही. ती संधी आणि समानता सूरजला सोशल मीडिया आणि एका रिअॅलिटी शोने दिली”. अभिजीतची ही सूरजची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या पोस्टला लाईक्स आणि कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या या आठड्यात फॅमिली स्पेशल भाग जरी सुरू असला तरीही घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी सगळेच सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता यांच्यापैकी कोण घराचा निरोप घेणार? आणि कोण या घरात टिकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे यंदाच्या भाऊच्या धक्क्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.