‘बिग बॉस मराठी’च्या घरात संग्राम चौघुलेने एंट्री घेतली तेव्हा घरातील समीकरणे काहीशी बदलतील अशी आशा होती. याप्रमाणे पहिल्या दिवशी संग्रामने आपला जलवाही दाखवला. मात्र, ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री करताच इतर स्पर्धकांपुढे दादागिरी करणारा संग्राम नंतर मात्र दिसेनासाच झाला. वाईल्ड कार्ड सदस्याला ‘बिग बॉस’चा खेळ, त्या खेळातील सदस्यांचा गेम प्लॅन या सर्व गोष्टी माहिती असतात. त्यानुसार वाइल्ड कार्ड सदस्य आपला गेम प्लॅन ठरवत असतो. पण संग्रामचा तसा गेम प्लॅन प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही. (Sangram Chougule On Abhijeet Sawant)
दोनच आठवड्यात संग्रामचा खेळ संपला असून वैद्यकीय कारणामुळे संग्रामला घराबाहेर पडावं लागलं आहे. नुकत्याच झालेल्या एका टास्कदरम्यान, संग्रामच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे आता संग्रामवर रुग्णालयात उपचार करण्यात येणार असून त्याची दुखापत ही गंभीर स्वरुपाची असल्याचंही बिग बॉसने म्हटलं. सध्या संग्राम रुग्णालयात उपचार घेत आहे. यावेळी थेट रुग्णालयातूनच त्याने लाईव्ह येत प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना संग्रामने पाठीमागून टोकणाऱ्या ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांबाबत भाष्य केलं.
संग्रामच्या मागे अभिजीतने केलेलं गॉसिप येताच यावर तो व्यक्त झाला आहे. यावेळी बोलताना संग्राम असे म्हणाला की, “वाईल्ड कार्ड म्हणून मी नॅशनल चेहरा म्हणून आत गेलो होतो. त्यामुळे अभिजीतला त्या घरात मी नॅशनल चेहरा आलो हे खटकलं. मी बाहेरुन खेळ पाहून गेलो होतो. त्यामुळे अभिजीत काय करतो हे मला चांगलं माहित होतं. अभिजीत टीम ए समो आणि टीम बी समोर जाऊन काय बोलतो हे मला चांगलं माहित होतं. स्वतःला सेफ करत तो उत्तम खेळ खेळत आला. टीम ए मधील काही लोक गेले त्यानंतर टीम बी मधील कमकुवत लोकांना काढत तो पुढे गेला. अभिजीतच्या डोक्यात गेम प्लॅन होता याबाबत मी अंकिताला सांगितलं तेव्हा अंकिता आधी मान्य करायला तयार नव्हती मात्र नंतर तिलाही माझं म्हणणं पटलं”.
पुढे तो म्हणाला, “सगळे मिळून मला ट्रोल करत होते. पण मी जाताना जो गेम पाहून गेलो त्यात मी इतकंच पाहिलं की अभिजीत दोन्ही टीमला फसवत होता. मला लागलं तेव्हा अभिजीतच असं म्हणणं होतं की, मला सुद्धा लागलं होतं. पण एवढी ओढाओढ त्याच्याबरोबर झाली नव्हती, त्यामुळे नाचता येईन अंगण वाकडे असं काहीस त्याच झालं आहे”.