Bigg Boss Marathi 5 Update : ‘बिग बॉस मराठी’चे हे नवीन पर्व पहिल्या दिवसापासूनच चांगलेच गाजत आहे. ‘बिग बॉस’चे पर्व कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’मध्ये १६ स्पर्धक असून केवळ कलाकारच नव्हे तर रील स्टार्स, कीर्तनकार, गायक व अभिनेते व पुढारी नेते म्हणून ओळखले जाणारे स्पर्धक यंदाच्या ‘बिग बॉस’ मध्ये सहभागी झाले आहेत. यंदाच्या पर्वात कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकरच्या एण्ट्रीने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. ‘बिग बॉस’ सुरु होण्याआधी अनेक दिवस तिच्या नावाच्या चर्चा होत होत्या. अशातच तिची या घरात एण्ट्री झाली. अंकिता वेळोवेळी घरामध्ये संभाषणाद्वारे आपलं मत मांडताना दिसत आहे. तसेच तिच्याबरोबर इतरांकडून केल्या जाणाऱ्या वर्तणूकीवर ती व्यक्त होताना दिसत आहे. (Bigg Boss Marathi 5 Ankita Walawalkar Cried)
‘बिग बॉस’च्या दुसऱ्या दिवशी निक्कीने अंकिताबरोबर केलेल्या वर्तणूकीमुळे ती दुखावली होती. यामुळे तिला रडू कोसळले होते. अशातच आजच्या भागातही अंकिताला रडू कोसळले आहे. अंकिताने तिला भांडी घासण्याचा ट्रॉमा असल्याचे म्हटलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता, पुरुषोत्तम व आर्या बसलेले असताना अंकिता आर्याला भांडण न करण्याचे सांगत असते. यानंतर ती रडत रडत “मला भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे” असं म्हणते. “मी भांडी नाही घासत. पण मी इथे तेसुद्धा करत आहे”. यावर आर्या तिला “मी भांडी घासेन” असं म्हणते. यानंतर अंकिता आर्याला “नाही मीच भांडी घासेन. कारण मला माझ्या कमतरतेवर मात करायची आहे. माझ्या घरच्यांना ही माहित आहे की, मी भांडी घासत नाही”.
यापुढे ती आर्याला समजावताना असं म्हणते की, “जिथे आपल्याला भांडणं दिसतात. तिथून आपण लांब जायचं. भांडण नाही करायचं. आपण आपल्या हक्कासाठी बोलणं हे बरोबर आहे. जिथे चुकतं तिथे आपण बोललचं पाहिजे. पण समोरची व्यक्ती हिंसक होताना दिसत आहे तर आपण शांत राहायचं”.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात नॉमिनेशनसाठी प्रेक्षकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अंकीता, वर्षा, सुरज, धनंजय व योगिता आदी स्पर्धक नॉमिनेशन प्रक्रियेत आहेत. त्यामुळे आता घरातून बाहेर कोण जाणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.