‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर अगदी दिमाखात पार पडला. यावेळी प्रेक्षकांच्या लाडक्या रितेश देशमुखने सर्व स्पर्धकांचं त्याच्या स्टाईलने स्वागत केलं. एकापेक्षा एक अशा १६ स्पर्धकांची घरात एण्ट्री झालेली पाहायला मिळाली. हे १६ स्पर्धक त्यांच्या स्टाईलने खेळ कसा रंगवणार हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. इतकंच नव्हे तर रितेश भाऊ कसा कल्ला करणार, स्पर्धकांची तो कशी शाळा घेणार हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे. अशातच ‘बिग बॉस’च्या या नव्या पर्वाचा पहिलाच प्रोमो समोर आला असून यांत स्पर्धकांची झालेली तारांबळ पाहायला मिळत आहे. (Bigg Boss Marathi 5 Updates)
‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांचे पहिल्याच दिवशी तोंडचं पाणी पळणार आहे. घरात पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार असल्याचं प्रोमोवरुन पाहायला मिळत आहे.समोर आलेल्या या प्रोमोमध्ये पहिल्याच दिवशी घरात पाणी येत नसल्याने सदस्यांची अडचण झालेली पाहायला मिळत आहे. “पाणी सगळं गेलेलं आहे, ‘बिग बॉस’ पाणी, सगळ्यात आधी आंघोळ करायची असते तर त्याच्यासाठी पाणी नाही, असं म्हणत स्पर्धक ‘बिग बॉस’ला पाणी सोडण्यास सांगत आहेत. पाणी अत्यावश्यक बाब असल्याने घरातील सर्व सदस्य हतबल झाले आहेत.
पाणी मिळण्यासाठी काकुळतीने ‘बिग बॉस’ला ते विनंती करत आहेत. त्यावर बिग बॉस म्हणतात,”आता फक्त घरातलं पाणी गेलं आहे. थोड्याच वेळात आपल्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळेल”. त्यामुळे पहिल्याच दिवशी स्पर्धकांना मोठा धक्का बसला आहे. ‘बिग बॉस’ यांनी दिलेला हा इशारा आता आणखी स्पर्धकांना कसा भारी पडणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या घराचं दार अखेर उघडलं आहे. पण यंदा चक्रव्यूहामुळे सदस्यांना त्यांच्याप्रमाणे खेळता येणार आहे. सदस्यांचा खेळ पलटवून लावायला आणि त्यांना पेचात अडकवायला ‘बिग बॉस’ आणि रितेश भाऊ सज्ज आहेत. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांना प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजेच बेड, बाथरुम, खाण्यापिण्याच्या सामानासाठी किंमत मोजावी लागणार आहे.
‘बिग बॉस’च्या घरात नेते, अभिनेते यांसह रीलस्टार, कीर्तनकार सहभागी झाले आहेत. वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी एण्ट्री घेतली आहे.