Bigg Boss Marathi Season 5 Opening Ceremony Updates : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा ‘बिग बॉस मराठी’ हा रिअॅलिटी शो आज अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या म्हणजेच बिग बॉस सिझन ५चे सूत्रसंचालन मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करत आहे. आता या शोमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा सूत्रसंचालक रितेश देशमुखची ग्रँड एण्ट्री झाली आहे. त्यानंतर आता घरात तीन स्पर्धकही सहभागी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून यावर्षी स्पर्धक म्हणून घरात कोण प्रवेश करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आज पार पडणाऱ्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात याचा उलगडा झाला आहे.
बिग बॉसच्या घरात ९०च्या दशक गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची एंट्री झाली आहे. त्यांच्याबरोबरच सोशल मीडिया इन्फ्लूएंसर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर व कलर्स मराठीवरीलच अभिनेता निखिल दामलेचा समावेश झाला आहे. यानंतर आता घरात विनोदी अभिनेते पॅडी कांबळे म्हणजेच अभिनेता पंढरीनाथ कांबळे यांनी एंट्री घेतली आहे.
वर्षा उसगांवकर, निखिल दामले, अंकिता वालावलकर, पॅडी कांबळे यांच्यानंतर कलर्स मराठीच्याच आणखी दोन अभिनेत्रींनी घरात एंट्री केली आहे. योगीता चव्हाण व जान्हवी किल्लेकर यांचीही या घरात एंट्री झाली आहे. हटके डान्स करत या दोघींनी या घरात प्रवेश केला आहे, जीव माझा गुंतला फेम योगीता व भाग्य दिले तू मला फेम जान्हवी किल्लेकर यांनी घरात प्रवेश केला आहे.
दरम्यान, नुकतीच ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाला धमाकेदार सुरुवात झाली असून हा नेत्रदीपक सोहळा प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीसह जिओ सिनेमावरही पाहता येणार आहे. रोज रात्री ९ वाजता ‘बिग बॉस मराठी’ हा शो बघता येणार आहे. २४ तास ड्रामा सुरु असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यावर्षी काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.