अलीकडे प्रत्येकाला सोशल मीडियाचं एक वेगळंच व्यसन लागलं आहे. रिल्ससाठी लोक काहीही करायला तयार असतात. मात्र, अनेकदा हे व्हिडिओ बनवणं आणि फोटो काढणं धोकादायकही ठरतं. इतकंच नाही तर यामुळं काहींना आपला जीवही गमवावा लागतो. अशातच नुकताच प्रसिद्ध ‘रील स्टार’आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सरचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अन्वी कामदार असं तिचं नाव असून ती मुंबईतील रहिवासी आहे. अन्वी ही तिच्या मित्र-मैत्रिणींसह रायगडमधील माणगावची होती. सात जणांचा हा ग्रुप धबधब्यावर आला होता. मात्र त्यावेळीच तिचा पाय घसरुन दरीत कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.
२७ वर्षांची अन्वी ही उच्च शिक्षित होती. तिच्या अकस्मात आणि दुर्दैवी मृत्यूमुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. अनेकजण तिच्या या आकस्मित निधनाबद्दल हळहळ व्यक्त करत आहेत. माणगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मुलुंड येथे राहणारी अन्वी पावसाळ्यात मित्र- मैत्रिणींबरोबर फिरायला गेली होती. व्यवसायाने सीए (चार्टर्ड अकाऊंटंट) असलेली अन्वी तिच्या सोशल मीडिया रिल्ससाठी प्रसिद्ध होती. अन्वी व तिच्या मित्रांचा एकूण सात जणांचा हा ग्रुप फिरायला गेला. तिथे एका कड्यावर अन्वी ही रील्स बनवत होती. मात्र तेवढ्यात पाय घसरून तिचा तोल गेला अन् ती ३०० फूट खोल दरीत कोसळली.
या घटनेनंतर पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी येऊन शोधमोहीम सुरु केली. दरी खोल असल्याने बचाव कार्यात अडथळा येत होता. त्यानंतर तब्बल ६ तासांच्या रेस्क्यूनंतर अवनीला बाहेर काढण्यात आलं. ती गंभीर जखमी झाली होती. तिला तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
आणखी वाचा – मलायका अरोराच्या आयुष्यातून अर्जुन कपूरचा पत्ता कट?, मिस्ट्री मॅनबरोबर परदेशात करतेय एन्जॉय, फोटो व्हायरल
दरम्यान, या घटनेअनंतर सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये तिच्या निधनाविषयी दु:ख व्यक्त केले जात असून तिला श्रद्धांजलीदेखील वाहिली आहे. तसेच रीलच्या नादात अनेकजण आपला जीव गमावतात. एक रील करण्यासाठी तरुण-तरुणी कोणत्याही थराला जाताना दिसतात, जीवावर उदार होऊन जोखीम पत्करतात याबद्दल टीकादेखील केली आहे.