प्रत्येकाच्या आयुष्यात आई-वडील यांचं स्थान हे खूप महत्त्वाचं असतं. डोक्यावर आई-वडिलांचे छत्र असणारा प्रत्येक माणूस हा भाग्यवानचं. पण हेच आई-वडीलांचं छत्र हरपलं तर कोणीही मनुष्य कोलमडूनचं पडेल. अशीच काहीशी अवस्था झाली होती एका मराठी अभिनेत्याची आणि हा अभिनेता म्हणजे ‘फुलाला सुंगध मातीचा’ फेम हर्षद अटकरी. कोरोना काळात कर्करोगामुळे हर्षदची आई गेली आणि त्यानंतर लगेच आठ महिन्यांनी कार्डियाक अरेस्ट अटॅकमुळे हर्षदच्या वडिलांचेही निधन झाले. या दु:खद प्रसंगाबद्दल हर्षदने नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केलं.
हर्षदने नुकतीच ‘कॉकटेल स्टुडिओ’ या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याचे आई-वडिलांच्या निधनाबद्दल सांगितले. यावेळी हर्षद खूपच भावुक झाला. याबद्दल बोलताना त्याने असं म्हटलं की, “कोरोना काळात आईला हृदयविकराचा झटका आला होता आणि त्यामुळे तिच्या शरीरात रक्ताच्या गुठल्या तयार झाल्या होत्या. त्यामुळेच तिला मग कॅन्सर झाला. तेव्हा मी महाराष्ट्राबाहेर शूट करत होतो. तेव्हा त्या सर्जरीनंतर त्या रक्ताच्या गाठीचे रुपांतर कॅन्सरमध्ये झालं. मग माझं शूटिंग संपवून मी घरी परतलो. तेव्हा तिचे उपचार सुरु होते. मात्र एक-दीड वर्षांनंतर ती गेली”.
यापुढे त्याने वडिलांच्या निधनाबद्दल असं म्हटलं की, “आईच्या जाण्यानंतर आठ महिन्यांनी बाबा गेले. त्याचं कारण म्हणजे कार्डियाक अरेस्ट. ते खूपच अनपेक्षित होतं. त्यांना याआधी तसा काही आजारही नव्हता. पण कदाचित एकटेपणा जो असतो तो त्यानी तेव्हा अनुभवला, आईच्या वेळी पण मी बाबांना फार काही सांगितलं नव्हतं. पण कदाचित त्यांचं एकमेकांवर प्रेम असेल म्हणून ते कदाचित मागोमाग गेले. एखादी व्यक्ती आजारी असताना आपल्याला माहीत काय होणार आहे हे माहिती असतं. पण बाबांचं जाणं हे माझ्यासाठी खूपच अनपेक्षित होतं आणि यामुळे मला खूपच दु:ख झालं. पण जे व्हायचं होतं ते झालं”.
दरम्यान, ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेमुळे त्याला खूपच लोकप्रियता मिळाली. या मालिकेत किर्ती आणि शुभमच्या हटके लव्हस्टोरीने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं. याआधी हर्षदने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘सारे तुझ्याचसाठी’, ‘अंजली’, ‘दुर्वा’ या मालिकांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.