अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा १२ जुलै रोजी अगदी राजेशाही थाटामाटात विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्न सोहळ्याला संपूर्ण बॉलिवूड उपस्थित होते. मात्र बच्चन कुटुंबीय व सून ऐश्वर्या राय यांनी स्वतंत्रपणे प्रवेश केला आणि एकत्र पोजही दिली नाही याची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. अमिताभ बच्चन पत्नी जया, मुलगा अभिषेक बच्चन, नातवंडे, मुलगी व जावई यांच्यासह पोहोचले होते. कॅमेरासमोर पोज देताना सर्वजण हसत होते. पण सून ऐश्वर्या राय वा नात आराध्या दोघेही यावेळी त्यांच्याबरोबर नव्हते. काही वेळाने ऐश्वर्या व आराध्या यांनी वेगळी एण्ट्री घेतली आणि त्यांनी कुटुंबाशिवाय मीडियाला पोज दिली. लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर काही वेळातच अमिताभ आपल्या कुटुंबासह घरी परतले आणि त्यांनी मध्यरात्री एक पोस्ट लिहिली. (Amitabh Bachchan Pens Note)
या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी छोट्या-छोट्या गोष्टींचे महत्त्व काय असते ते सांगितले आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नातील संपूर्ण बच्चन कुटुंबाचे फोटो व्हायरल होत आहेत. ज्याप्रकारे संपूर्ण बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या राय एकमेकांकडे दुर्लक्ष करताना दिसत होते आणि एकत्र पोजही देत नव्हते, त्याच प्रकारे अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या बातम्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ऐश्वर्या राय बच्चन व मुलगी आराध्यापासूनही अभिषेक खूप दूर दिसला.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी या शाही विवाह व नातेसंबंधांवर आपल्या ब्लॉगमध्ये एक पोस्ट लिहिली आहे. अमिताभ यांच्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमिताभ यांनी पोस्ट लिहीत असं म्हटलं की, “या काळातही काही लोकांशी संपर्क साधण्याची इच्छा व दृढनिश्चय आहे. बऱ्याच जणांसाठी ही कामावर जाण्याची वेळ असेल पण माझ्यासाठी माझ्या EF म्हणजेच विस्तारित कुटुंबाशी जोडण्याची वेळ आहे. मी नुकताच एका अप्रतिम अशा शाही लग्नातून परतलो आहे, पण जुने मित्र व हितचिंतक भेटल्यानंतर मी फक्त प्रेम व आपुलकीचा खजिना घेऊन परतलो आहे. खूप प्रेम व आपुलकी मिळाली”.
अमिताभ यांनी पुढे असे लिहिले, “त्यांच्या चेहऱ्यावर व दिसण्यात बदल झाला असला तरी, एकत्र असताना आमच्या एकमेकांबद्दलच्या प्रेमात, आपुलकीमध्ये कोणतीही कमी नाही. हे जीवन प्रेम, नाती व आपुलकी जपण्यासाठी आहे. पण हे विचित्र आहे की, एकमेकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी किती अवलंबून असतात. ज्यांच्याशी आपला खोल संबंध होता किंवा त्यांच्याबरोबर चांगला वेळ आपण घालवला त्या गमावल्या जातात आणि विसरल्या जातात. खरंच विसरलेले नाही आहे पण कुठेतरी काहीतरी मागे राहिले आहे. जेव्हा त्या सहवासाला किंवा नातेसंबंधाला अर्थ असतो तेव्हाच ते लक्षात ठेवले जातात किंवा त्यांचा उल्लेख केला जातो”.