‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या पर्वाची विजेती दिव्या अग्रवाल ही ‘बिग बॉस’मुळे चांगलीच लोकप्रिय झाली. अभिनेत्री तिच्या खाजगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहत असते. अशातच दिव्या अग्रवाल व तिचा पती एका नवीन अडचणीत अडकल्याचे दिसत आहे. एका व्यक्तीने त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला असून त्याने पैसे दिले नसल्याचे सांगितले आहे. दिव्या अग्रवालने आपला फोन नंबरही ब्लॉक केला असल्याचा दावा त्या व्यक्तीने केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मध्यस्थी करणारा रफिक मर्चंट या व्यक्तीने दिव्या अग्रवाल व तिचा व्यावसायिक पती अपूर्व पाडगावकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
रफिकचा या दोघांवर असा आरोप आहे की, त्याने दिव्या अग्रवालला तिची अपार्टमेंट विकण्यात मदत केली. पण दिव्या व तिच्या पतीने त्याला मध्यस्थीमधील टक्केवारीमध्ये ठरलेली रक्कम दिली नाही. रफिकने व्हिडिओमध्ये दिव्या अग्रवालला सांगितले की, “तुम्ही मीटिंगला हजेरी लावली आणि नोंदणीमध्येही भाग घेतला. पण नंतर तुम्ही माझ्या कॉलला उत्तर देणे बंद केले आणि मला ब्लॉकदेखील केलं आहे. अपूर्व पाडगावकर, तुम्ही एक प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि यशस्वी उद्योजक आहात. मग तुम्ही हे का करत आहात? तुम्ही लोक पुढे जाऊन तुम्हाला हवे ते करु शकता, पण आमची रोजीरोटी हिरावून घेऊ नका. कृपया मला माझ्या मध्यस्थीमधील एक ठरावीक रक्कम द्या”.
हेही वाचा – “मालिका बघण्यातच रस नाही”, ‘सातव्या मुलीची…’ मालिकेवर भडकले प्रेक्षक, कथा पाहून म्हणाले, “फक्त फालतूपणा…”
व्हिडिओमध्ये रफिक मर्चंटने असाही दावा केला आहे की, दिव्या अग्रवाल व अपूर्व यांनी त्यांना फ्लॅट विकून कोणताही फायदा झाला नाही. रफिकच्या मते, त्याने दिव्या व तिच्या पतीला फ्लॅट विकत घेताना मदत केली होती आणि त्यानंतर त्यांनी तो फ्लॅट विकला तेव्हादेखील त्याने या दोघांना मदत केली. या संपूर्ण प्रकरणावर दिव्या अग्रवाल व तिच्या पतीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हेही वाचा – मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा एकदा ईडीचे समन्स, चौकशीसाठी बोलावलं अन्…; अडचणीत वाढ होणार
दरम्यान, रफिकचे म्हणणे आहे की, दिव्या व तिचा पती त्याला २ लाख ३९ हजार रुपये देण्यास नकार देत आहेत. तर अभिनेत्रीने रफिकचा हा आरोप खोटा असल्याचे म्हटले आहे. ‘दैनिक भास्कर’शी बोलताना दिव्याने असं म्हटलं की, “मी सध्या या विषयावर बोलू शकत नाही. मी एवढेच सांगू इच्छिते की, हे सर्व आरोप खोटे आहेत. आम्ही आमच्या वकिलाशी बोललो आहोत. आम्ही आमचे निवेदन लवकरच जाहीर करु”.