“हसताय ना? हसायलाच पाहिजे” असं म्हणत प्रेक्षकांना आपलसं करणारा निवेदक व अभिनेता म्हणजे डॉ. निलेश साबळे. गेल्या काही वर्षांपासून ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाची एकहाती सूत्रे सांभाळणारा हा अवलिया कलावंत. केवळ निवेदनच नाही तर लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या सर्व जबाबदाऱ्याही अगदी लिलया पेलतो. आयुर्वेदाची एम.एस. ही पदवी घेतल्यानंतर निलेशने ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्याने ‘फू बाई फू’ या कार्यक्रमातूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आणि मग ‘चला हवा येऊ द्या’ या प्रसिद्ध कार्यक्रमाच्या दिग्दर्शन व सुत्रसंचलनाची धुरा सांभाळत त्याने गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केलं.
मनोरंजन क्षेत्रात आल्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. मात्र त्याचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. या प्रवासात त्याला साथ मिळाली ती त्याच्या कुटुंबियांची. मुख्यत: त्याची पत्नी गौरीची. निलेश व गौरी एका कॉलेजमध्ये नसतानाही त्यांची ओळख झाली. निलेश एका कार्यक्रमानिमित्त गौरीच्या कॉलेजमध्ये गेला असता तिथं गौरीबरोबर त्याची ओळख झाली. त्यानंतर दोघं एकमेकांचे चांगले मित्र बनले, नंतर या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. त्यांची ही लव्हस्टोरी नेमकी कशी होती?, नक्की कुणी कुणाला प्रपोज केलं?, याबद्दल निलेशची पत्नी गौरी साबळेने सांगितले आहे.
गौरीने नुकतीच ‘असोवा’ या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या व निलेश साबळेच्या लव्हस्टोरीबद्दल सांगताना असं म्हटलं की, “आम्ही दोघे मित्र-मैत्रीण होतो. निलेशला मी आवडायचे हे पूर्ण कॉलेजला माहित होते. कॉलेजच्या बाहेरच्या लोकांनाही हे माहीत होतं. माझं कॉलेजच्या स्टाफलादेखील निलेशला मी आवडते हे माहीत होतं. आम्ही एकमेकांशी खूप बोलायचो. चार-चार तास आम्ही गप्पा मारायचो. त्यामुळे हा आपल्या थेट का बोलत नाही? हा प्रश्न मला पडायचा. निलेश बाकीच्या सर्व लोकांना सांगतोय की, ही मला आवडते पण तो मला काहीच बोलत नव्हता”.
यापुढे ती असं म्हणाली की, “मग आम्ही एक दिवशी एकमेकांना भेटायचं असं ठरवलं आणि आम्ही कोल्हापूरला भेटलो. तेव्हा ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. तेव्हा तो चित्रपट बघायचा आम्ही ठरवलं आणि त्या चित्रपटाच्या मध्यांतरात मी निलेशला विचारलं की, “संपूर्ण कॉलेज, माझ्या सगळ्या मैत्रिणी, कॉलेजचा स्टाफ या सर्वांना माहीत आहे की, मी तुला आवडते. मग हे तू मला का सांगत नाहीयेस”. यावर तो म्हणाला, “तुला माहीत आहे मग तू उत्तर दे ना” असं म्हणाला. मग मी त्याला “उत्तराशिवाय मी इथे आले का?, मी आले म्हणजे याचं उत्तर हो आहे” असं म्हटलं. दरम्यान, निलेश साबळे सध्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.