सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत विरोचक नेत्राच्या बाळापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. नेत्राचे बाळ कसे आहे आणि त्या बाळापासून आपल्याला काही धोका तर नाही ना? यासाठी विरोचक वारंवार आपल्या प्रतिबिंब शक्तीचा वापर करत आहे. अशातच आजच्या भागातदेखील विरोचकाने तेजसचे प्रतिबिंब तयार करुन फाल्गुनीच्या रुममध्ये पाठवले. मात्र त्याआधीच फाल्गुनीने खऱ्या तेजसबरोबर फोनवर संवाद साधल्याने तिला तिच्या खोलीत आलेला तेजस हा प्रतिबिंब असल्याचे पटकन ओळखता आले.
प्रतिबिंबाच्या वारंवार नेत्राच्या बाळाबद्दल विचारण्याचा फाल्गुनीला संशय आल्याने तिने लगेच तेजसला व्हिडिओ कॉल करुन तिच्या खोलीत आलेला तेजस हा प्रतिबिंब असल्याची खात्री करुन घेतली. त्यानंतर तिने आरडाओरडा करत सर्वांना बोलवून घेतले. तिच्या आवाजाने सगळेच तिच्या खोलीत जमले. त्यानंतर नेत्राने त्या प्रतिबिंबाला धरुन विरोचकाकडे नेले आणि तुझ्या या बालिश शक्तीचा काहीही उपयोग नसल्याचं ठणकावून सांगितलं.
पुढे नेत्राला विरोचकाने हातात चाकू घेतला असून विरोचक त्या चाकूने तिच्यावर वार करत असल्याचे स्वप्न पडतं. त्यानंतर रुपालीदेखील नेत्राच्या गर्भावर हात ठेवून तो मंत्र कसा म्हणयाचा याचा विचार करत असते. त्यानंतर सकाळी इंद्राणी नेत्राला विरोचक आज काहीतरी करणार असल्यामुळे सावध राहण्याची गरज असल्याचे सांगते. त्यानंतर विरोचक बाहेर जात असताना दोघी बघतात आणि मग लगेच विरोचकाच्या मागे इंद्राणी जाते.
विरोचक बाहेर गेल्यामुळे नेत्रा, शेखर व अद्वैत तिच्या खोलीत जाऊन ध्वज शोधतात. मात्र त्यांच्या हाती काहीच लागत नाही. त्यामुळे आता विरोचकाचा नेत्राच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न यशस्वी होणार का? आणि तो ध्वज राजाध्यक्षांच्या हाती लागणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.