मराठी मनोरंजन विश्वात कायमच सक्रिय असणारे दिग्दर्शक म्हणजे समीर विद्वांस. मराठीसह त्यांनी हिंदी सिनेविश्वातही महत्त्वपूर्ण कामगिरी करत प्रेक्षकांची मन जिंकली. दिग्दर्शक समीर विद्वांस हे नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. जुईली सोनलकरसह त्यांचा विवाह संपन्न झाला आहे. अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन त्यांच्या लग्नसोहळ्यातील खास फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर समीर विद्वांस यांच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे. (Sameer Vidwans Wedding)
काही दिवसांपूर्वीच मराठी कलाकारांनी मिळून त्यांचं केळवण केलं होतं. या केळवणाला हेमंत ढोमे, क्षिती जोग, चिन्मय मांडलेकर व त्याची पत्नी नेहा, लोकेश गुप्ते असे सगळे कलाकार उपस्थित होते. यानंतर त्यांच्या हळदीचे फोटोही समोर आले. घरच्या घरीच अत्यंत साधेपणाने त्यांनी हळदी समारंभ उरकला. हळदी, केळवण झाल्यानंतर आता त्यांचं लग्नही झालं आहे. समीर व जुईली यांच्या लग्नातील लूकने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

यावेळी समीर यांची पत्नी जुईली यांनी हिरव्या रंगाची सुंदर अशी साडी, त्यावर लाल रंगाची शाल, केसात गजरा, हातात हिरवा चुडा परिधान करत केलेला पारंपरिक लूक लक्षवेधी ठरला. तर समीर यांनी कुर्ता, पायजमा व टोपी परिधान केली होती. “आयुष्यभर असेच एकत्र राहा. तुम्हाला वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा”, असं कॅप्शन देत हेमंत ढोमेने समीर विद्वांस यांच्या लग्नाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधत त्यांनी साखरपुडा सोहळा उरकला होता. साखरपुड्याचे काही खास फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. जुईली सोनलकरबरोबर समीर यांचा साखरपुडा पार पडला त्यानंतर साखरपुडा सोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. समीर-जुईली हे दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांबरोबर काम करत आहेत. जुईलीदेखील गेली अनेक वर्ष सिनेक्षेत्रात कार्यरत आहे. दोघांचे अनेक एकत्र फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. अनेक वर्षांची मैत्री आणि प्रेम, यानंतर अखेर दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. दोघांनी लग्न करत त्यांच्या आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे.