अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी आजवर त्यांच्या अभिनयशैलीने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतही नीना यांनी त्यांच्या महत्त्वपूर्ण अभिनय शैलीने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावरही नीना बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच नीना यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये नीना कुळकर्णी जेवण बनवताना दिसत आहेत. (neena kulkarni troll)
नीना यांनी खास माशांच्या जेवणाचा बेत केलेला पाहायला मिळत आहे. नीना यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचे पती दिलीप कुळकर्णी यांची आठवण काढलेली पाहायला मिळत आहे. नवऱ्याची आठवण काढत त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ प्रेक्षकांच्याही पसंतीस पडला असून प्रेक्षकही कमेंटद्वारे दिलीप यांची आठवण काढताना दिसत आहेत. नीना या व्हिडीओमध्ये मासे बनवताना दिसत आहेत. खेकडे, पापलेट आणि कोळंबी त्या बाजारातून घेऊन आल्या असून त्यांनी खास बेत केलेला पाहायला मिळत आहे.

हा बेत पाहून काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलही केलं आहे. नेटकऱ्यांना ट्रोल करायला काही कारण लागत नाही. मात्र खाण्यापिण्यावरुन जातिभेत, धर्मभेद करणं हे अत्यंत चुकीचे आहे. कुळकर्णी हे विशेषतः ब्राह्मण समाजात येतात, त्यामुळे ब्राह्मण लोक मासे कसे खाऊ शकतात, हा प्रश्न नेटकऱ्यांमध्ये उपस्थित झाला असून यावरुन त्यांनी कमेंट करत ट्रोल केलं आहे. असं असलं तर काही चाहत्यांनी नीना यांची बाजू घेत ट्रोल करणाऱ्यांना उत्तरही दिलं आहे.

“अहो ब्राह्मणना तुम्ही”, “तुम्ही कुलकर्णी नाव बदलून टाका”, “कुलकर्णी नाव चेंज करा ब्राह्मण आहात ना तुम्ही वा छान”, “कुळकर्णी आणि नॉनव्हेज, किती सुंदर विचार आहेत”, अशा कमेंट करत त्यांना ट्रोल केलं आहे. यावर काही चाहत्यांनी प्रतिउत्तर देत, “असं कुठेही लिहिलेलं नाही आहे की ब्राह्मणांनी खाऊ नये”, “सगळे कुलकर्णी ब्राह्मण नसतात काही सीकेपीही असतात”, असं म्हणत नीना यांची बाजू घेतली आहे.