झी मराठी वाहिनीवरील काही गाजलेल्या मालिकांमध्ये ‘खुलता कळी खुलेना’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या मानसी, मोनिका व विक्रांत या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांचे चांगलंच मनोरंजन केलं. या मालिकेत अभिनेता ओमप्रकाश शिंदे, अभिनेत्री मयुरी देशमुख व अभिज्ञा भावे यांनी मुख्य भूमिका साकारली होती. ओमप्रकाशने विक्रांत तर मयुरीने मानसी ही भूमिका साकारली होती.
या मालिकेतील मयुरी म्हणजेच अभिनेत्री मयुरी देशमुख मालिका विश्वात पाहायला मिळाली नाही. ती काही चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र मालिकांपासून अभिनेत्री काही काळ लांब राहिली. अशातच आता ‘खुलता कळी खुलेना’ फेम मयुरी देशमुख तब्बल सहा वर्षांनंतर मराठी मालिकाविश्वात जबरदस्त कमबॅक करत आहे. ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत मयुरीची लवकरच एण्ट्री होणार आहे.
आणखी वाचा – “नुकतीच माझी आई गेली…”, सविता मालपेकरांच्या आईचं निधन, तरीही शूट करत आहेत अन्…; म्हणाल्या, “दुःख आहेच पण…”
मयुरीने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून तिने ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतील तिच्या एण्ट्रीबद्दल सांगितले आहे. यामध्ये ती असं म्हणाली आहे की, “मी मयुरी देशमुख. मी तुमच्या आवडत्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतून तुमच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत मी सुखदा ही भूमिका साकारत असून ही भूमिका खुपच रंजक आहे. याआधी मी अशी भूमिका केलेली नाही. मला ही भूमिका साकारताना मज्जा आली तीच मज्जा तुम्हालाही येईल”.
अभिनेत्री मयुरी देशमुख ‘खुलता कळी खुलेना’ मालिकेनंतर हिंदी मालिका आणि काही चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. अलीकडेच तिचा ‘लग्नकल्लोळ’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता ती मराठी मालिकाविश्वाशात कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान, ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता सुखदाच्या येण्याने सार्थक व आनंदीच्या नात्यात काय बदल होणार? हे येत्या काळात पाहायला मिळणार आहे.