टेलिव्हिजनच्या मालिका कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. मालिका आणि मालिकेतील कलाकार प्रेक्षक सहसा विसरत नाही. कलाकारांबरोबरच या मालिकेची एक वेगळी खासियत असते ती म्हणजे मालिकांची शीर्षक गीतं. मालिकांच्या शीर्षकगीतांची एक वेगळीच परंपरा आहे. मात्र हीच परंपरा आता लोप पावत असल्याचे दिसत आहे. हल्ली छोट्या पडद्यावरील कोणत्याच मालिकेचं शीर्षकगीत टीव्हीवर दाखवले जात नाही. याबद्दल नुकतेच गायिका सावनी रवींद्र व गायिका प्रियंका बर्वे यांनी मुलाखतींमधून भाष्य केलं आहे.
“हल्ली मालिकांची शीर्षकगीतं हिट होत नाहीत; कारण ती वाजलीच जात नाहीत. शीर्षकगीतं लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. जर मालिका सुरू होण्याआधी त्याचं शीर्षकगीत दाखवलंच जात नसेल तर ते बनवायचंच कशाला?” असा सवाल सावनीने केला होता. यावर आता अभिनेत्री हेमांगी कवीनेही तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हेमांगीने तिच्या एका मालिकेच्या शीर्षकगीताचा व्हिडीओ शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.
या पोस्टमध्ये हेमांगीने असं म्हटलं आहे की, “जेव्हा मालिकांना शीर्षकगीतं असायची, ती वेगळी चित्रीत केली जायची आणि मालिकेच्या सुरवातीला ४०-६० सेकंदासाठी दाखवली ही जायची! आपण प्रेक्षक आवडीने ते पाहायचे, ऐकायचे. अशा किती मालिका आहेत ज्याची शीर्षकगीतं आजही २०-२२ वर्ष झाली तरी आठवतात आणि आवडतात”.
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “आता इतक्या वाहिन्यांवरील मालिकांच्या चढाओढीमुळे सरळ मालिकेचे भाग सुरू करतात. एक एक सेकंदही महत्त्वाचा असतो. त्यात त्यांचाही दोष नाही, प्रेक्षक आपली मालिका सोडून इतर कुठे ही जाऊ नये, म्हणजे इतर कुठल्याही वाहिनीकडे वळू नये म्हणून जे शक्य आहे ते करतात. त्यात या शीर्षकगीतांचा बळी गेला. असो”.
आणखी वाचा – एकीकडे रुपाली घेत आहे घरातल्यांची काळजी तर दुसरीकडे इंद्राणीकडून श्लोकाचे वाचन, अस्तिकट्टयार मिळणार का?
या पोस्टनंतर अभिनेत्रीने प्रेक्षकांना एक प्रश्न विचारला आहे. “मालिकेच्या सुरुवातीला अशी शीर्षकगीतं पुन्हा दाखवायला हवीत असं तुम्हांला खरंच वाटतं का? आणि तुमचं आवडतं शीर्षकगीत कोणतं?” असा प्रश्न हेमांगीने प्रेक्षकांना व तिच्या चाहत्यांना विचारला आहे.