‘काहे दिया परदेस’ या लोकप्रिय मालिकेतून ‘शिवकुमार’ भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे ऋषी सक्सेना. ‘काहे दिया परदेस’ या ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत त्याने साकारलेली शिवकुमारची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. या भूमिकेमुळेच त्याची सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण झाली. ‘काहे दिया परदेस’ मालिकेनंतर तब्बल ६ वर्षांनंतर ऋषी पुन्हा एकदा मराठी मालिकाविश्वात पुनरागमन करणार आहे.
आपल्या भूमिकांनी चर्चेत राहणारा ऋषी सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. सोधल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच अभिनेत्याने सोशल मीडियावर त्याच्या ‘आई कुठे काय करते’मधील एण्ट्रीबद्दलचा एक खास व्हिडीओ शेअर केला. यामध्ये त्याने मी येत्या ९ जूनपासून या मालिकेत तुम्हाला दिसणार आहे. असं म्हटलं आहे. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स करत त्याच्या एण्ट्रीबद्दल उत्सुकता दाखवली आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये मालिकेत येण्याबद्दल त्याचे स्वागत केले आहे.

आणखी वाचा – शनिवारी तूळ व कर्क या राशींचे भविष्य उजळणार?, शनिदेवाच्या कृपेने होणार आर्थिक भरभराट, जाणून घ्या…
दरम्यान, या व्हिडीओखालील एका कमेंटने नेटकऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. ऋषी सक्सेनाच्या मालिकेतील एण्ट्रीवर एका नेटकऱ्याने अभिनेत्याला खोचक प्रश्न विचारला आहे. नेटकऱ्याने ऋषीला कमेंट्समध्ये “भाई येत आहेस तर ये, असं पण आम्ही त्या मालिकेकडे दुर्लक्षच करत आलो आहोत. पण दुसरा नवरा वगैरे बनून येऊ नको म्हणजे झालं” असं म्हटलं आहे. यावर ऋषीनेही या नेटकऱ्याला त्याच्या खास अंदाजात प्रतिउत्तर देत “नवरा बनून नाही येणार मग बघशील ना?” असं म्हटलं आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये ऋषीची एण्ट्री येत्या ९ जूनपासून होणार असून या मालिकेत ऋषी मिहीर शर्मा ही व्यक्तिरेखा साकारत आहे. मिहीर शर्मा हा उत्तम शेफ असून त्याची आई अरुंधतीची खूप मोठी चाहती होती. आपल्या मुलाने अरुंधतीकडून गाणं शिकावं ही तिची इच्छा होती. त्यामुळे आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिहीर अरुंधतीकडून गाण्याचे धडे घेणार असल्याचे या मालिकेत पाहायला मिळणार आहे.