देशभरात गेल्या काही दिवसांपासून लोकसभेसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया सुरु असलेली पाहायला मिळाली. अखेर आज मतदान प्रकियेचा निकाल जाहीर होणार आहे. आज सकाळपासून मतमोजणी सुरु असून सगळ्यांच्या नजरा निकालाकडे लागून राहिल्या आहेत. अशातच बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कंगना रणौत हिने देखील लोकसभेच्या या निवडणुकीत बाजू मारलेली पाहायला मिळत आहे. कंगना रणौतने हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. आणि निवडणुकीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. सध्या सर्वच स्तरातून अभिनेत्रीवर अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे. सर्वप्रथम अभिनेते अनुपम खेर यांनी कंगनाचे अभिनंदन केले आहे. ( Anupam Kher Congratulations Post For Kangana Ranaut)
बॉलिवूडची पंगा गर्ल म्हणजेच कंगना रणौत आता राजकारणाच्या क्षेत्रात उतरली आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत तिने हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. आणि या निवडणुकीत अभिनेत्री आघाडीवर असून तिने विजेतेपद पटकावले आहे. अभिनेत्रीचे चाहते आणि जवळच्या लोकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या यादीत बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांचाही समावेश आहे. अनुपम खेर यांनी कंगना रणौतचे अभिनंदन केले आहे. त्याने अभिनेत्रीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये कंगनाची निवडणूक प्रचारादरम्यानची छायाचित्रे जोडण्यात आली असून पार्श्वभूमीत जुगनी हे गाणे वाजत आहे. याचबरोबर त्यांनी कंगनाचे कौतुक करत कॅप्शन लिहिले आहे. अभिनेत्याने लिहिले आहे की,”माझी प्रिय कंगना, बहुमताने विजयी झाल्याबद्दल तुझ अभिनंदन. तू रॉकस्टार आहेस”.
अनुपम खेर यांनी कंगनासाठी पोस्ट लिहीत पुढे असेही म्हटलं की, “तुझा आतापर्यंतचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. हिमाचल प्रदेश आणि मंडीमधील लोकांसाठी आणि तुझ्यासाठी खूप आनंद झाला आहे. तू वेळोवेळी सिद्ध केलं आहे की, जर एखाद्याने लक्ष केंद्रीत करुन कठोर परिश्रम केले तर काहीही होऊ शकतं. जय हो”. अनुपम यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी व समर्थकांनी कमेंट करत कंगनाला शुभेच्छा दिल्या आहेत.