छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अनघा अतुलने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. रंग माझा वेगळा’ या मालिकेतून अभिनेत्री घराघरांत पोहोचली. या मालिकेत तिने नकारात्मक भूमिका साकारली होती. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी अनघा सोशल मीडियाद्वारेही तितकीच चर्चेत राहत असते. अशातच तिने नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तिच्या लहान भावाची लगीनघाईचे काही खास क्षण शेअर केले आहेत.
फेब्रुवारी महिन्यात अखिलेश भगरेच्या लग्नाची सुपारी फुटली होती. याचा फोटो पोस्ट करत अनघाने ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती आणि आता ती त्याच्या लग्नाच्या तयारीला लागली आहे. अनघाच्या भावाच्या लग्नापूर्वीचे काही कार्यक्रम सुरू झाले असून याची खास झलक अनघाने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. अभिनेत्रीच्या घरी तिच्या भावाच्या लग्नाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे.
त्याचबरोबर काही व्हिडीओमधून पोळपाट लाटणं, जातं, सुप, खलबत्ता, चुलं असं सर्व काही फुलांनी सजवलेलं दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये हळद कुटण्याचा कार्यक्रमात होताना दिसत आहे. अखिलेश कुटुंबातील महिलांबरोबर हळद कुटताना पाहायला मिळत आहे. यावेळी अनघानेदेखील या मोठ्या कौतुकाने व आनंदाने सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे. तसेच ती तिच्या भावंडांसह नाचत एन्जॉय करतानाचेही काही व्हिडीओमध्ये दिसत आहे.
अनघा व अखिलेश या दोन बहीण-भावांचा बॉण्ड खूपच खास आहे. दोघांनी पुण्यात हॉटेल सुरु केलं असून त्याचं नाव ‘वदनी कवळ’ असं आहे. त्यांच्या या हॉटेलला मराठी कलाकारांसह अनेक खवय्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो.
दरम्यान, अनघाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात तिची लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर ती ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यामुळे आता अभिनेत्री पुन्हा एकदा कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.