‘आई कुठे काय करते’ मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत आशुतोषच्या मृत्यूनंतर अरुंधतीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यावेळी कांचन व अप्पा अरुंधतीला आधार देत देशमुखांच्या घरी राहायला सांगतात. मात्र यश व आरोहीच लग्न होईपर्यंत अरुंधती देशमुखांच्या घरी राहणार असल्याचं सांगते. त्यानंतर अरुंधती देशमुखांच्या समोरच नवं घर घेऊन तिथे राहायला लागते. तर इकडे देशमुखांच्या घरी व्यवहारावरून नवीनच संकट उभं राहिलेलं असतं. (Aai Kuthe Kay Karte Promo)
देशमुखांकडे संजना मुद्दाम नाटक करते की, अनिरुद्धची दोन्ही मुलं कोणताच वाटा देत नाहीत आणि केवळ अनिरुद्धच्या जीवावर उड्या मारतात. तर कांचन आई यांना गुडघेदुखीचा त्रास असतो. त्यामुळे गुढघेदुखीवर उपाय म्हणून त्या वाण सामानातून तेल मागवतात. यावर संजना खूप काही बोलून दाखवते, त्याचवेळी अरुंधती तिथे येते आणि संजनाने बॉडीलोशन, बॉडीवॉश मागवलेलं असतं त्या उपयोगाच्या वस्तू आहेत का असा जाब विचारते.
तर इकडे अनिरुद्धही संजनाला चांगलंच सुनावतो. तू कमावतेस तर यापुढे तुझं सामान तू आणत जा असंही तो तिला सांगतो. त्यांनतर मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अभि अरुंधतीकडे काही पैसे मागताना दिसत आहे. यावर अरुंधती “मी एकही पैसे देणार नाही”, असं सांगताना दिसत आहे. यावर अनिरुद्धही अरुंधतीला पैसे द्यायला सांगतो. त्यावर कांचनही अभि अडचणीत असल्याचं सांगते. यावर अभि, “तू किती आतल्या गाठीची आहेस. इथे राहत होतीस, खात-पीत होतीस, कशी या सगळ्याचा हिशोब केला आहेस का?”, असं स्पष्टपणे म्हणतो.
अभिच्या या बोलण्यावर अरुंधतीचा राग अनावर होतो. अरुंधती अभिला बोलते, “हिशोब करायचा आहे तर तीस वर्षांपासून सुरुवात करूया की त्याआधी नऊ महिने पोटात वाढवलं तेव्हापासून सुरुवात करूया. आजकाल पोटात मूल वाढवायचेही पैसे घेतात अभि. तू माझा तीस दिवस इथे राहण्याचा खर्च काढतोय. मला तुझ्या तीस वर्षांचा हिशोब दे”, असा अरुंधती अभिला जाब विचारताना दिसत आहे. आता मालिकेत नेमका कोणता ट्विस्ट येणार हे पाहणं रंजक ठरेल.