सर्व रिऍलिटी शो चा बाप उद्या येतोय असा कलर्स मराठी वाहिनीचा एक प्रोमो समोर आला. तेव्हापासून या प्रोमोची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. हा रिऍलिटी शो म्हणजे बिग बॉस मराठी असल्याचा अंदाज अनेकांनी लावलेला पाहायला मिळाला. कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओद्वारे ‘बिग बॉस’च्या नवीन पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. (Riteish Deshmukh Hosting Bigg Boss Marathi)
या नवीन व्हिडीओमध्ये एका शोचे काऊंटडाउन होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच या नवीन व्हिडीओखाली लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओखाली “सर्व रिअॅलिटी शोजचा बाप, पुन्हा येतोय सर्वांना वेड लावायला. पहिली झलक पहा उद्या २१ मे, सकाळी १० वाजता” असं म्हटलं आहे. तेव्हापासून या शोबाबतची उत्सुकता साऱ्यांना लागून राहिली होती. आता नुकताच या उत्सुकतेला पूर्णविराम मिळणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या वेळी ‘बिग बॉस’ मराठीचे होस्टिंग बॅालीवूडचा स्टार, प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करणार असल्याचं समोर आलं आहे. ‘कलर्स मराठी’ आणि ‘जिओसिनेमा’च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ‘बिग बॉस मराठी’चा व्हिडिओ शेअर केला आला असून त्यामध्ये ‘बिग बॉस’चा डोळा त्याचबरोबर बॅालीवूडचा स्टायलिश हिरो आणि महाराष्ट्राचा मराठमोळा मुलगा सुपरस्टार रितेश देशमुखदेखील दिसत आहे. या नव्या सिझनचे हे नवे सरप्राईज असणार असून या सिझनमध्ये एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त आणि लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’चं नाव घेतलं जातं. ‘आपला मराठी बिग बॉस’ म्हणत ‘बिग बॉस’चा आवाज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. पहिले चार पर्व या कार्यक्रमाने मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठमोळ्या थिमसह ‘बिग बॉस’च्या चारही पर्वांची बरीच चर्चा झाली. ‘बिग बॉस’चे आतापर्यंतचे चारही पर्व अनेक कारणांनी चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळाले. आता ‘बिग बॉस’चे पाचवे पर्व किती आणि कसे गाजणार हे पाहणं रंजक ठरेल. शिवाय यंदाच्या ‘बिग बॉस’मध्ये कोणते कलाकार झळकणार हे पाहणंही औत्स्युक्याचे ठरेल.