छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त परंतु तितकाच लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’चं नाव घेतलं जातं. ‘आपला मराठी बिग बॉस’ म्हणत ‘बिग बॉस’चा आवाज महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला. पहिले चार पर्व या कार्यक्रमाने मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठमोळ्या थिमसह ‘बिग बॉस’च्या चारही पर्वांची बरीच चर्चा झाली. ‘बिग बॉस’चे आतापर्यंतचे चारही पर्व अनेक कारणांनी चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळाले. आशातच गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या कार्यक्रमाच्या पाचव्या पर्वाची वाट पाहत आहेत आणि त्याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओद्वारे ‘बिग बॉस’च्या नवीन पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. या नवीन व्हिडीओमध्ये एका शोचे काऊंटडाउन होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच या नवीन व्हिडीओखाली लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओखाली “सर्व रिअॅलिटी शोजचा बाप, पुन्हा येतोय सर्वांना वेड लावायला. पहिली झलक पहा उद्या २१ मे, सकाळी १० वाजता” असं म्हटलं आहे.
‘बिग बॉस मराठी’चे आतापर्यंत चार पर्व झाले असून येत्या पाचव्या पर्वासाठी सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘बिग बॉस’चे आतापर्यंत चार पर्व झाले असून हे चारही पर्व चांगलेच गाजले. या चारही पर्वांचे सूत्रसंचालन महेश मांजरेकरांनी केले होते. त्यामुळे येत्या पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार? याशिवाय या नवीन पर्वात कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार? हे पाहणंदेखील औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्या पर्वाच्या विजेतेपदावर मेघा धाडेने नाव नोंदवलं होतं. त्यानंतर दुसऱ्या पर्वाचा विजेता हा शिव ठाकरे होता. तिसऱ्या पर्वाचा विजेता हा विशाल निकम झाला होता. त्याचप्रमाणे चौथ्या पर्वाच्या विजेतेपदावर अक्षय केळकरने नाव नोंदवलं होतं. अशातच आता या नवीन पर्वाच्या स्पर्धकांबद्दल, सूत्रसंचालकाबद्दल, कार्यक्रमाच्या रूपरेषेबद्दल आणि एकूणच ‘बिग बॉस’ या नवीन पर्वाविषयी सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.