मराठी मनोरंजन विश्वात मनसोक्त मुशाफिरी करत अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या काही मोजक्या अभिनेत्रींमध्ये तेजश्री प्रधानच्या नावाचा समावेश आहे. सोशल मीडियावर तेजश्रीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरही तेजश्री नेहमीच सक्रिय असते. तेजश्रीच्या पोस्टवर उत्साहानं कमेंट करणाऱ्या नेटकऱ्यांची कमी नाही. तेजश्रीचा नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी काही ना काही शेअर करत असते. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून तेजश्री ही प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर तिनं केवळ मालिकाच नाही तर मराठी नाटकं, सिनेमा आणि सीरिज मधून देखील स्वतःची वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली. (Tejashri Pradhan Emotional Post)
सध्या तेजश्री ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेत तेजश्री मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेतील तिची सोज्वळ आणि सुशील सूनेची भूमिका साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. याआधी ही अनेक मालिकांमधून तेजश्रीने सूनेची भूमिका साकारत अष्टपैलू सून यावर शिक्कामोर्तब केला आहे. तेजश्री नेहमीच तिच्या व्यावसायिक गोष्टींसह वैयक्तिक गोष्टीही शेअर करताना दिसते.
काही महिन्यांपूर्वीच तेजश्रीबाबत चाहत्यांना धक्का बसेल अशी एक बातमी समोर आली होती. ती म्हणजे तेजश्रीच्या आईचे सीमा प्रधान यांचे निधन झाले. सहा महिन्यांपूर्वी तेजश्रीच्या आईने अखेरचा श्वास घेतला. यानंतर आता आईला जाऊन सहा महिने पूर्ण होताच तेजश्रीने आईसाठी पहिल्यांदा पोस्ट शेअर केली आहे. आईला सहा महिने पूर्ण होताच तेजश्रीने आईबरोबरचा फोटो शेअर करत भावुक असं कॅप्शनही दिलं आहे. “आई… ६ महिने झाले. पाठीशी आहेस ना, अशीच कायम राहा”, असं कॅप्शन देत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीमा प्रधान या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यात त्यांचे १६ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या जाण्यानं तेजश्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला. चाहत्यांनी तसेच कलाकार मंडळींनी तेजश्रीच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करुन तिचे सात्वंन केले आहे.