होळीचा सण जवळ आला असून सर्वत्र पुरणपोळीचा खमंग सुगंध सुटलेला पाहायला मिळत आहे. पुरणपोळी ही होळी सणाची खासियत आहे. या सणाला होलिका दहन करण्यावेळी होलिकामातेला पुरणपोळीचा नैवेद्य देऊन हा सण अगदी थाटामाटात साजरा करतात. अनेकांच्या घरी यादिवशी पुरणपोळी हमखास बनविली जाते. बऱ्याच जणांना कामानिमित्त म्हणा वा एखाद्या अडचणीमुळे पुरणपोळी घरी बनवणं शक्य नसतं. अशावेळी बाहेरुन पुरणपोळी काहीजण ऑर्डर करतात. बरेचदा काही महिलावर्ग वा कुटुंबीय आहेत ते पुरणपोळीचा व्यवसाय करतात. (Holi special puranpoli)
घराला हातभार लावण्यासाठी प्रत्येक नारी आपल्यातोपरी झटत असते. अशातच एका वेळेला जवळपास हजार-दीड हजार पुरणपोळी बनवणाऱ्या चित्रा काकींच करावं तितकं कौतुक कमीच. ‘मज्जा पिंक’ या युट्युब चॅनेलने या अहोरात्र मेहनत करणाऱ्या माईची भेट घेतली. आणि त्यांचा पुरणपोळीपर्यंतचा प्रवास प्रेक्षकांसमोर आणला. कामाचा कितीही भार असला तरी त्याच उत्साहाने, प्रत्येक सणाला त्याच ताकदीने पुरणपोळी बनवणाऱ्या ‘आई पुरणपोळी माहेर घर’च्या सर्वेसर्वा चित्रा मनसुख यांचं करावं तितकं कौतुक कमीच. या प्रवासात त्यांच्या पाठीशी त्यांचं संपूर्ण कुटुंब असलेलं ही पाहायला मिळालं. सुरुवातीला अगदी पहाटे इतरांच्या घरी जाऊन पुरणपोळी बनवत असत. दोन वर्ष लोकांच्या घरी जाऊन पुरणपोळी बनवल्या, त्यांनतर त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली.
एक रुपयाला चपाती विकण्यापासून त्यांचा हा प्रवास सुरु झाला. सगळ्यात पहिली होळीसाठी त्यांना २५० पुराणपोळींची ऑर्डर आली. इतकंच नव्हेतर, पोळ्या विकून त्यांनी स्वतःच घर घेतलं. त्यानंतर मुलं ते नातवंड सांभाळत त्यांनी हा व्यवसाय सुरुच ठेवला. होळीच्या आधीच्या दिवसांत सकाळी ९ ते रात्री १२, १ वाजेपर्यंत एकाजागी बसून त्या जवळपास १० हजार पुरणपोळी बनवतात. व्यवसाय म्हटलं की चढ-उतार आले. बरेचदा त्यांना या व्यवसायातही चढ-उतारांचा सामना करावा लागला. महागाईनुसार त्यांचे भाव न वाढता ते नेहमीच त्यांचे दर आहे तेच ठेवतात. अडीच रुपयाला एक पुरणपोळी या भावाने त्यांनी विकायला सुरुवात केली. ते आज त्यांच्याकडे ३३ ते ६० रुपयांपर्यंतच्या पुरणपोळी उपलब्ध आहेत.
जवळपास त्या तासाला एकट्या सव्वाशे पुरणपोळ्या बनवतात. आज ‘आई पुरणपोळी माहेर घर’चा प्रवास पुढे बराच पुढे गेला असून अनेकांच्या मुखाला लागलेल्या पुरणपोळीच्या चवीची ही पोचपावती आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. यंदाची होळी पुरणपोळीने बहारदार करण्यासाठी ‘आई पुरणपोळी माहेर घर’च्या चित्रा मनसुख यांच्या हातची पुरणपोळी खायला विसरू नका. ‘आई पुरणपोळी माहेर घर’ मधून पुरणपोळी ऑर्डर करण्यासाठी तुम्ही समीर मनसुख ९३६९१०५९२१, रंजना सावळ ८१०४१३५८२४, अमर मनसुख ९०८२००२९४ या क्रमांकावर संपर्क साधू शकता. अधिक माहितीसाठी सदर व्हिडीओ पूर्ण पाहा.