साऊथ चित्रपटसृष्टीमधून एकामागोमाग एक दुःखद बातम्या समोर येत आहेत. अशातच आणखी एका दुःखद बातमीने साऊथ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तेलगू अभिनेता आणि चित्रपट निर्माते सूर्य किरण यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांचे कुटुंब आणि संपूर्ण सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. वयाच्या ५१व्या वर्षी सूर्य किरण यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सूर्य किरण यांना काविळीचा त्रास होता. प्रवक्ते सुरेश यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये ही दुःखद माहिती शेअर केली आणि म्हटले आहे की, “दिग्दर्शक सूर्य किरण यांचे चेन्नईतील रुग्णालयात आजारपणामुळे निधन झाले, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी मी प्रार्थना करतो”. (Surya Kiran Death)
सूर्य किरणने अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले आहे. तसेच दिग्दर्शक म्हणूनही त्याने उत्तम भूमिका निभावली आहे. बाल कलाकार म्हणून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आणि त्यानंतर अनेक तमिळ व तेलुगू चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. सूर्य किरण १९८१मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कदल मींगल’, ‘मंगम्मा सबधम’, ‘मनिथन’, ‘स्वयं कृषी’ व ‘कैदी नंबर ७८६’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे.
सूर्य किरणने ‘सत्यम’, ‘ब्रह्मास्त्रम’, ‘राजू भाई’ व ‘चॅप्टर ६’ असे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. सूर्य किरण दिग्दर्शित पहिला चित्रपट ‘सत्यम’ हा होता. हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला ज्यामध्ये सुमंत व जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत दिसले होते. २०२० मध्ये, सूर्य किरण ‘बिग बॉस’ तेलगूच्या चौथ्या सिझनमध्ये दिसला होता.