राज्यात मराठा आरक्षणावरुन सध्या सर्वे सुरु असल्याचं बरेच दिवसांपासून कानावर येत आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जात जातीय आधारित माहिती गोळा करताना दिसत आहेत. यावरुन काही कलाकारांनी केलेलं वादग्रस्त विधान सध्या चर्चेत आलं आहे. बीएमसी कर्मचाऱ्यांनी घरी येत चौकशी केल्यानंतर अभिनेता पुष्कर जोग व अभिनेत्री केतकी चितळेने केलेल्या पोस्टने चांगलंच गदारोळ माजलेला पाहायला मिळाला. यावरुन राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही दोन्ही कलाकारांवर टीका केलेली पाहायला मिळत आहे. (Pushkar Jog And Ketaki Chitale Troll)
प्रशांत जगताप यांनी ट्विटरवरुन याबाबतचा रोष व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. दोघांच्याही आडनावासह नाव घेत त्यांनी या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. “चितळ्यांची केतकी व जोगांचा पुष्कर यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी. आपल्या घरी सर्वेक्षणासाठी येणारे कर्मचारी हे हौस म्हणून येत नाहीत, ते शिंदे व फडणवीस सरकारच्या आदेशाने येतात. म्हणून शहाणपणा शिकवायचा असेल तर तो शिंदेंना शिकवा आणि कानाखाली मारायची असेल तर…”, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
चितळ्यांची केतकी व जोगांचा पुष्कर यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी…
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) January 29, 2024
आपल्या घरी सर्वेक्षणासाठी येणारे कर्मचारी हे हौस म्हणून येत नाहीत, ते शिंदे आणि फडणवीस सरकारच्या आदेशाने येताय. म्हणून शहाणपणा शिकवायचा असेल तर तो शिंदेंना शिकवा आणि कानाखाली मारायची असेल तर….
:आज ज्या दिवशी भारत सार्वभौम प्रजासत्ताक झाला, त्या दिवशी महानगरपालिका भेदभाव करण्यासाठी लोकांना घरी पाठवून, दारं ठोठवून जात विचारत आहे. अब गाओ संविधान, संविधान,” असं केतकीने व्हिडीओ शेअर करत म्हटलं होतं. तर पुष्करने, “जात विचारणाऱ्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या” अशा आशयाची पोस्ट केल्याने ते चर्चेत आले.
पुष्कर जोग, केतकी चितळेच्या या पोस्टनंतर अनेक कलाकारांनीही रोष व्यक्त केलेला पाहायला मिळाला. किरण माने, अभिजीत केळकर यांसारख्या अनेक कलाकारांनी जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं.