प्रत्येक कलाकार त्यांच्या शूटिंगमधून वेळ काढत सतत काही ना काही गोष्टी करत असतो. त्यातील बरेच जण ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करतात, तर काही जण त्यांची आवड जपताना दिसतात. लोकप्रिय मराठी अभिनेत्री जुई गडकरीही शूटिंगमधून वेळ काढत तिच्या गाण्याची आवड जपते. जुईने गेली अनेक वर्ष मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ज्यात तिने साकारलेल्या सर्वच पात्रांना भरपूर प्रेम मिळालं. रील लाईफप्रमाणे ती रिअल लाईफमध्ये एकदम साधी असून तिच्या साधेपणाचे नेहमीच कौतुक होत असते. (Jui Gadkari sings a Song)
जुई सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत दिसते. तिने या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पुनर्पदार्पण केले असून तिची ‘सायली’ हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. त्याचबरोबर तिच्या या मालिकेला भरभरून प्रेम मिळत असून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत कायम आहे. अभिनयाबरोबरच ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून शूटिंगमधून वेळ काढत ती सतत विविध फोटोज व व्हिडीओज शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. असाच एक व्हिडीओ तिने नुकताच पोस्ट केला. जे पाहून चाहत्यांनी तिचं कौतुक केलं.
हे देखील वाचा – “श्वसनाचा त्रास…”, वाढतं प्रदूषण पाहता भडकली केतकी माटेगावकर, महापालिकेला केली विनंती, म्हणाली, “प्रचंड त्रास होतो कारण…”
जुईने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती मालिकेच्या सेटवर अंगाई गाताना दिसली. हा व्हिडीओ शेअर करताना ती म्हणाली, “आज २ सीनमधून गॅप मिळाला, म्हणून थोडासा “मी टाईम”! काही गाणी ऐकूनच खुप शांत वाटतं, त्यातीलच एक म्हणजे ही अंगाई. रोज शूटचं पॅकअप झाल्यावर घरी जाताना मी ‘मी वंसंतराव’ हा अल्बम ऐकते. हा चित्रपट उत्तम आहेच, पण यातल्या गाण्यांचं काय करायचं? एकाच अल्बममध्ये भावगीत, नाट्यगीत, ठुमरी, बैठकीची लावणी, गझल, शास्त्रीय बंदिशी, अंगाई अशी एकाहून एक गाणी, उत्तम संगीत नियोजन. या अल्बममधील ‘राम राम’ ही अंगाई मला खूप आवडते. श्रेया घोषाल यांच्या गोड आवाजातली ही अंगाई मला गायचा मोह अवरला नाही. आणि मी नेहमी म्हणते तसंच मला गायला आवडतं, मग सूर नीट लागो ना लागो. ही अंगाई गाऊन मला छान वाटतं.”, असं म्हणत तिने राहुल देशपांडे आणि निपुण धर्माधिकारी यांचे कौतुक केले. तिच्या या पोस्टवर दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी तिचे आभार मानले.
हे देखील वाचा – रेड कार्पेटवर येताच ऐश्वर्या नारकर यांच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष, डिझाइन आहे फारच खास, म्हणाल्या, ” अविनाशनेच मला…”
तसेच तिच्या चाहत्यांनीही कमेंट करत तिचे कौतुक केले. एक चाहता यावर म्हणाला, “सुर कसा ही लागो किंवा न लागो, ते मनापासून केले”. तर दुसरा नेटकरी, “खूप सुंदर आवाज. आताच्या अनेक अभिनेत्रींना वेळ मिळाला की डान्स किंवा शॉपिंग करताना दिसतात. पण तुम्ही खूप सर्वांपेक्षा सुखी, समाधानी आहेत आणि आपली मराठी संस्कृती जपतात.”, अशी कमेंट केली आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी तिच्या गायनाचे कौतुक केले आहे. याआधीही जुई सेटवर आणि कार्यक्रमांमध्ये गाताना दिसली असून तिच्या गाण्याचे भरपूर कौतुक झालेले आहे.