सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरु असताना अनेकजण बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. अनेकांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. काहींच्या राहत्या घरी तर काहींच्या मूळगावी बाप्पाचं आगमन झालं आहे. अनेक चाकरमानी बाप्पाच्या दर्शनासाठी मूळगावी रवाना झाले होते. सर्वसामान्यांप्रमाणे मराठी मनोरंजन सृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेते अविनाश नारकर हे देखील गणेशोत्सवासाठी त्यांच्या गावी गेले आहेत. विशेष म्हणजे, तब्बल चार वर्षांनी ते त्यांच्या गावी गेले असून त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला होता. (Avinash Narkar On Ganeshotsav and Konkan)
यंदाचा गणेशोत्सव नारकरांसाठी विशेष आहे. कारण, त्यांनी यंदाचा गणेशोत्सव आपल्या कोकणातील गावी साजरा केला आहे. गणेशोत्सवानिमित्ताने अविनाश नारकर हे गावी जरी गेले असले तरी त्यांची गावाकडची ओढ प्रत्येक व्हिडिओमधून दिसून येतेय. अविनाश नारकर यांनी गावच्या निसर्गरम्य वातावरणातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या त्यांच्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा रंगली आहे. कारण या व्हिडिओमध्ये त्यांनी निसर्गाचं कौतुक करत गणपती बाप्पाच्या गाण्यावर ठेका धरला आहे. नारकर हे रील्स व व्हिडीओसाठी प्रसिद्ध आहेत. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या नारकर कपलच्या डान्सला तोडच नाही.
नुकताच एक गावच्या नयनरम्य वातावरणातील व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये “हे माझं गाव. भुईबावडा, वरती गगनबावडा आणि खाली घाट उतरला की भुईबावडा. काय अप्रतिम निसर्ग आहे बघा. या सगळ्यापेक्षा आणखी वेगळा असा स्वर्ग काय असतो? म्हणून तर गावी यायलाच पाहिजे आणि गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये यायलाच पाहिजे.” असं म्हणत त्यांनी ‘माझ्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यावर ठेका धरला.
हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शन देत म्हटलं आहे की, “यंदा गणपती बाप्पाच्या उत्सवासाठी गावी गेलो होतो! व्वा व्वा व्वा !! निसर्गाच्या सहवासात मन आणि शरीर बघा कसं ताजंतवानं आणि टवटवीत होतं ते!! निसर्गाचा सहवास आणि बाप्पाचा ध्यास, करी साऱ्या दु:खांचा ह्रास !! गणपती बाप्पा मोरया !” त्यांच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलं आहे की, “आमचं पण गाव हेच आहे.” तर एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, “ऐश्वर्या मॅडम नाही आल्या का?”. अविनाश नारकरांचा गावच दर्शन घडविणारा हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडला आहे.