मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने कायमच जिंकतात. त्यामुळे ते प्रेक्षकांचे आपलेसे वाटतात. प्रेक्षक कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतात. आणि कलाकारदेखील त्यांच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट चाहत्यांसमोर नेहमीच शेअर करतात. प्रत्येकाला वाटतं की, आपलं स्वतःचं घर असावं. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकांची तारेवरची कसरत सुरु असते. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक कलाकारांच्या घराची स्वप्न पूर्ण झाली आहे. यात आता आणखी एका कलाकाराचा समावेश झाला आहे, ते नाव म्हणजे अभिनेत्री स्मिता शेवाळे. (Smita Shewale New Home)
चित्रपट व मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या स्मिताने नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘सुभेदार’ चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत झळकली आहे. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळत असून चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे तिला खूप आनंद झाला आहे. आता स्मिताने तिच्या चाहत्यांसमोर आणखी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
अभिनेत्री स्मिता शेवाळे सोशल मीडियावर सक्रिय आहे. कामाव्यतिरिक्त तिच्या कुटुंबासोबतचे अनेक व्हिडिओज शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. स्मिताने नवीन घर घेतलं असून तिने तिच्या कुटुंबासह नव्या घरात प्रवेश केला आहे. गृहप्रवेशाचा हा व्हिडिओ तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे, ज्यात ती तिच्या घराची पूजा करताना दिसत आहे. शिवाय, अभिनेत्रीने यावेळी पारंपरिक लुक परिधान केला असून तिच्या या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शेअर केलेल्या या व्हिडिओवर कॅप्शन देताना स्मिता म्हणते, “घर म्हणजे केवळ घर नसतं असल्या जरी चार भिंती, तरी जगण्यासाठी विणलेलं सुंदर स्वप्न असतं…. आपुलकीच्या झुरोक्यातून इथे प्रेमाचं वारं वाहत असतं.” तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिने सुभेदारला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. “‘सुभेदार’ सिनेमाने बॉक्स ऑफिसचा गड ही सर केला, हे सगळं तुम्हा निष्ठावंत प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य आहे… मन:पूर्वक धन्यवाद !”, असं तिने म्हटलं आहे.
२००६ मध्ये आलेल्या ‘यंदा कर्तव्य आहे’ चित्रपटातून स्मिताने अभिनय क्षेत्रात पदार्पण केला होता. त्यानंतर तिने अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘सुभेदार’ चित्रपटातही स्मिताने महत्वाची भूमिका साकारली असून तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रेम मिळत आहे. शिवाय, छोट्या पडद्यावर सुरु असलेल्या ‘मुरांबा’ मालिकेतही ती काम करत आहे. (Smita Shewale New Home)