नृत्यांगना मानसी नाईक हिने तिच्या नृत्यशैलीने आजवर अनेकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. तिच्या नृत्याच्या अदाकारीने तिने सिनेसृष्टीत स्वतःच स्थान स्वतः निर्माण केलं. नेहमीच ती अनेक रील्स, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांसोबत संपर्कात राहत असते. याशिवाय ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते. मानसीने पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेतला असल्याच्या चर्चांना उधाण आलं होत. आता याबाबतचा खुलासा करत तिने नुकतंच भाष्य केलं आहे.
मानसी नाईक हिने तिच्या खासगी आयुष्याबाबत नुकत्याच भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती’ या पॉडकास्टमध्ये भाष्य केलं आहे. नेमकं काय म्हणाली आहे मानसी हे जाणून घेऊया आजच्या ‘जपलं ते आपलं’ या भागात. या मुलाखतीदरम्यान बोलताना मानसीने लग्न, घटस्फोट व खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. याबाबत बोलताना मानसी म्हणाली की, “प्रत्येक मुलीच्या बकेट लिस्टमधील इच्छा असते की, लग्न करावं, कुटुंब असावं”. (Manasi Naik On Marriage)
“मी लग्नानंतर बांगड्या, भांगेत कुंकू या सर्व गोष्टी मी प्रेमाने केल्या. लग्नसंस्था, सप्तपदी, मेहंदी यांसारख्या गोष्टींचा अनेकजण अनादर करतात, माजही दाखवतात. पण आता मी त्यातून बाहेर पडलीय. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. मला लग्न करायचं होतं. माझं कुटुंब असावं वैगरे असं मला वाटतं होतं. पण खरंतर रीलपुरतंच हा प्रवास होता. फक्त मीडिया, प्रसिद्धी या गोष्टींसाठी हे सर्व होतं”.
“मला जे काही सांगण्यात आलं, त्यातील एकही गोष्ट खरी नव्हती. मला नेहमीच एक सून म्हणून, बायको म्हणून मला माझं कुटुंब हवं होतं. ते स्वप्न माझं अपुरं राहिलं आहे. पण मी आता ते मी नक्कीच पूर्ण करेन. कारण माझा प्रेमावरचा विश्वास उडालेला नाही. मी ग्लॅमरस दिसत असले तरी माझे पाय जमिनीवर आहेत. मी जर माझ्या अंगी एखादी गोष्ट आणली तरच मी माझ्या मुलांना ते शिकवू शकेन. मला आईदेखील व्हायचं होतं, म्हणूनच मी रडले”,असं मानसी म्हणाली.

मानसी नाईक व प्रदिप खरेरा यांनी १९ जानेवारी २०२१ रोजी लगीनगाठ बांधली. लग्नाआधी ते काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. लग्नादरम्यान ते दोघे सोशल मीडियावर बरेच ऍक्टिव्ह होते, अनेक रोमँटिक फोटोही त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केले होते. मात्र त्यांच्यातील वादानंतर दोघांनीही इन्स्टाग्रामवरून एकमेकांबरोबरचे फोटो डिलीट केले.