Mukul Dev Passes Away : बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता मुकूल देवचं निधन झालं आहे. शुक्रवारी (२३ मे) दिल्ली येथे मुकूलने शेवटचा श्वास घेतला. त्याच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण कलाविश्वालाच मोठा धक्का बसला. अवघ्या ५४व्या वर्षी मुकूलने जगाचा निरोप घेतला. त्याने आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबरीने हिंदी मालिकांमुळे मकूल घराघरांत पोहोचला. मात्र गेल्या काही काळापासून मुकूल फार कुठे दिसला नाही. त्याच्या निधनाची बातमी समोर येताच चाहत्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. मुकूल बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता राहुल देवचा भाऊ आहे. राहुलने आता भावाच्या निधनाबाबत पोस्ट शेअर केली आहे. (Brother Rahul dev on mukul dev death)
राहुल व मुकूल दोन्ही भावांनीही चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. दोन्ही भावांचंही एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम होतं हे काही फोटोंमधून दिसूनच येतं. मुकूलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे राहुलचे काही फोटो शेअर केले होते. तसेच भावावरचं प्रेम व्यक्त केलं. राहुलचं भरभरुन कौतुकही केलं. आता भावाच्या जाण्याने राहुलवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत मुकूलच्या निधानाबाबत अधिकृत माहिती दिली.
राहुल म्हणाला, “काल रात्री दिल्लीमध्ये माझा भाऊ मुकूल याचं निधन झालं. त्याच्या पश्चात त्याची मुलगी सिया देव आहे. भावंड रश्मी कौशल, राहुल देव आणि पुतण्या सिद्धांत देवला त्याची आठवण येईल”. त्याचबरोबरीने राहुलने मुकूलच्या अंतिम यात्रेबाबात माहिती दिली आहे. तसेच त्याच्यावर अत्यंसंस्कार कधी होणार? याविषयी सांगितलं. दिल्ली येथील मुकूलच्या राहत्या घरापासून सायंकाळी ५ वाजता अंतिम यात्रेला सुरुवात होणार आहे. भावाला शेवटचा निरोप देताना राहुलला कठीण जात आहे.

आई-वडिलांच्या निधनानंतर मुकूलने स्वतःला घरातच कोंडून घेतलं होतं. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातच त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याला एक मुलगीही आहे. मुकूलने आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. १९९६ला ‘मुमकिन’ मालिकेतून त्याने कलाविश्वात पदार्पण केलं. ‘वजूद’, ‘कोहराम’, ‘मुझे मेरी बीवी से बचाओ’, ‘यमला पगला दीवाना’, ‘सन ऑफ सरदार’, ‘आर राजकुमार’, ‘जय हो’ सारख्या चित्रपटात मुकुलने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. ‘कहीं दिया जले कहीं जिया’, ‘कहानी घर घर की’, ‘प्यार जिंदगी है’ यांसरख्या त्याच्या मालिका विशेष गाजल्या.