Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राज्यभरात विविध प्रकारच्या चर्चांना तोंड फुटलं आहे. वैष्णवीने राहत्या घरी गळफास घेतला. मात्र ही आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचं कुटुंबियांकडून वारंवार सांगण्यात आलं. दोन वर्षांपूर्वी वैष्णवी व शशांक हगवणे यांचं थाटामाटात लग्न झालं. लग्नाला लाखो रुपये खर्चही करण्यात आला. ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर कार, महागड्या वस्तू शशांकला लग्नात देण्यात आला. मात्र त्यानंतरही वैष्णवीच्या कुटुंबियांकडे हगवणे यांच्याकडून पैसे व इतर वस्तूंसाठी मागण्या होतच राहिल्या. वैष्णवीला अखेरीस घरातून बाहेर काढण्यातही आलं. मात्र सासरच्या छळाला कंटाळून तिने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. आता या संपूर्ण प्रकारावर सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेने त्याचं मत मांडलं आहे. (Hemant dhome on vaishnavi hagawane death case)
वैष्णवीचं माहेरकडील आडनाव कस्पटे आहे. प्रेमविवाह केल्यानंतर वैष्णवीचं आडनाव बदललं. हगवणे आडनावानेच तिची नव्याने ओळख सुरु झाली. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तर तिचं संपूर्ण कुटुंबच कोलमडलं आहे. आई-वडिलांना लेकीचा छळ होत आहे हे माहित असूनही काहीही करता आलं नाही. वैष्णवीसाठी योग्य निर्णय घेण्याच्या आतच तिचं आयुष्य संपलं. आता या संपूर्ण प्रकारावर हेमंतने त्याचं मत मांडलं आहे. तसेच वैष्णवीला हगवणे म्हणून न बोलू नका असंही म्हटलं आहे.
आणखी वाचा – सासू-सासरे, नणंद, दीराने मारत कपडे फाडले, कोणत्याही थराला जाऊन…; हगवणेंच्या मोठ्या सूनेचे धक्कादायक आरोप
अभिनेत्याची पोस्ट काय?
वैष्णवी कस्पटे (मुळ नाव) आणि तेच वापरावं! ज्या आडनावाने तिचा बळी घेतला ते नकोच!
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) May 22, 2025
या आपल्या बहिणीचा आजच्या काळात हुंडाबळी गेलाय! गेली अनेक वर्ष तिचा छळ झालांय…
चूक दोन्ही बाजूची आहे… सासरकडच्यांची आणि हुंडा देणाऱ्या आईबापाची सुद्धा!
लवकरात लवकर कठीण कारवाई झाली पाहिजे आणि…
हेमंत म्हणाला, “वैष्णवी कस्पटे (मूळ नाव) आणि तेच वापरावं. ज्या आडनावाने तिचा बळी घेतला ते नकोच. या आपल्या बहिणीचा आजच्या काळात हुंडाबळी गेला आहे. गेली अनेक वर्ष तिचा छळ झाला आहे. चूक दोन्ही बाजूची आहे. सासरकडची आणि हुंडा देणाऱ्या आई-बाबा यांचीही चूक आहे. लवकरात लवकर कठीण कारवाई झाली पाहिजे. यापुढे आपल्या महाराष्ट्रात तरी अशा घटना होऊ नयेत. म्हणूनच आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे”. हेमंतच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांची मत मांडली आहेत.
तुम्हाला वाटतं का काही होईल?, पोकळ आशावाद, जे झालं ते वाईट झालं पुन्हा असं होऊ नये. पण ५१ तोळे सोनं आणि ५० लाखांची गाडी देण्याची काय गरज होती?, तुम्ही भूमिका मांडल्याबद्दल धन्यवाद, हेमंद दादा आता यावर लोकांचं प्रबोधन होईल असा एक चित्रपट बनवा, नवरा व सासऱ्याला फाशीपेक्षा कमी शिक्षा नको अशा अनेक कमेंट हेमंतच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. आता वैष्णवीला खरंच न्याय मिळणार का?, हे प्रकरण कुठपर्यंत पोहोचणार हे येत्या दिवसांमध्ये स्पष्ट होईलच.