Dipika Kakar Tumor Surgery : दीपिका कक्कर व शोएब इब्राहिम सध्या कठीण प्रसंगाला सामोरं जात आहेत. दीपिकाला पोटात ट्युमर असल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं. यानंतर शोएबसह संपूर्ण कुटुंबियांना मोठा धक्का बसला. फक्त पोट दुखत होतं. त्यादरम्यान दीपिकाने या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं. हे दुखणं साधंच असल्याचा समज झाला. मात्र वेदना वाढल्यानंतर दीपिका डॉक्टरकडे गेली. यादरम्यानच्या काळात शोएबही कामानिमित्त बाहेर होता. दीपिकाला डॉक्टरांकडून काही तपासण्या करण्यास सांगण्यात आलं. त्या संपूर्ण अहवालात भलतंच चित्र पाहायला मिळालं. डॉक्टरांनी लिव्हरच्या डाव्या बाजूला टेनिस बॉलएवढा ट्युमर आहे असं सांगितलं. हे सगळं ऐकून दीपिका व शोएबच्या पायाखालची जमीनच सरकली. आताही ती गंभीर परिस्थितीशी दोन हात करत आहे. (dipika kakar health update)
शोएब त्याच्या व्लॉगद्वारे चाहत्यांना संपूर्ण माहिती देत आहे. दीपिकाची सध्याची परिस्थिती कशी आहे? याबाबत सांगत आहे. आताही त्याने एक व्लॉग शेअर केला. यामध्ये त्याने दीपिकाची आताची परिस्थिती कशी? याविषयी सांगितलं. तो म्हणाला, “मी सगळ्या गडबडीमध्ये होतो. त्यामुळे दीपिकाची आताची परिस्थिती कशी आहे? याबाबत सांगू शकलो नाही. पण अजूनही दीपिकाची सर्जरी झाली नाही”.
“दीपिकाची सर्जरी कधी होणार? याची आम्हीही वाट पाहत आहोत. आम्ही गेल्यावेळी जेव्हा रुग्णालयात गेलो तेव्हा दीपिकाच्या काही तपासण्या करण्यात आल्या होत्या. तपासणीनंतर दीपिका मुलगा रुहाननंतरही दूर राहत होती. तपासणी केल्यानंतर रुहानला दूध पाजणंही दीपिकाने बंद केलं. त्यानंतर सर्जरीसाठी आम्हाला रुग्णालयात जायचं होतं. मात्र दीपिकाची तब्येत आणखीनच बिघडली. तिला १०३ पेक्षा जास्त ताप येत होता. खूप वेदना होत होत्या. बरीच औषधंही घेतली पण त्रास काही थांबलाच नाही”.
२६ मेला दीपिकाची सर्जरी होण्याची शक्यता असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. याचबाबत शोएबने सांगितलं. तो म्हणाला, “डॉक्टरांनी ज्या तपासण्या करण्यास सांगितल्या होत्या त्या झाल्या आहेत. आता आम्हाला कळेल की, नक्की काय उपचार करायचे आहेत. पोटातील ट्युमर काढणं गरजेचं आहे. हे मी आधीही सांगितलं होतं. इतर राहिलेल्या तपासण्या झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात सर्जरी होईल. तुम्ही सगळ्यांनी दीपिकासाठी प्रार्थना करा”. अचानक प्रसंग ओढावल्यानंतर दीपिकासह शोएबही पूर्णपणे खचला आहे.