कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कर्जत येथील त्यांच्या ‘एनडी स्टुडिओ’ येथे आत्महत्या करत त्यांनी त्यांचं जीवन संपवलं. अद्याप त्यांच्या मृत्यमागचं खरं कारण स्पष्ट झालेलं नाही आहे, मात्र त्यांच्यावर खूप मोठं कर्ज असल्याची बाब समोर आली आहे. आर्थिक विवंचनेत असल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याची सर्वत्र चर्चा आहे. त्यांची आर्थिक परिस्थती समोर आणणारा एक अहवाल नुकताच ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने सादर केला आहे. (Nitin desai Suicide Case)
‘एडलवाईस एआरसी’ने नितीन देसाई यांच्या ‘एनडीज आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड’ विरुद्ध दिवाळखोरीच्या कारवाईसंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी नितीन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “नितीन देसाई यांच्या निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे आणि या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती मनापासून शोक व्यक्त करतो,” असं त्यांनी या अहवालात म्हटलं आहे.
पाहा ‘एडलवाईस एआरसी’ने निवेदनात उघड केलं नितीन देसाईंवरील कर्ज (Nitin desai Suicide Case)
नितीन देसाई यांच्या कंपनीवर एकूण २५२ कोटी रुपयांची थकबाकी होती. आणि त्या अंतर्गत एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठाने २५ जुलै २०२३ रोजी नितीन देसाई यांची कंपनी ‘ND’s Art World Private Limited ‘ विरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते. आदेशात खंडपीठाने दिवाळखोरीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी जितेंद्र कोठारी यांची अंतरिम रिझोल्यूशन प्रोफेशन म्हणून नियुक्ती केली होती.
दरम्यान, एनसीएलटीच्या आदेशाविरुद्ध नितीन देसाईंच्या कंपनीने एनसीएलएटीच्या नवी दिल्लीतील खंडपीठामध्ये अपील केले होते. पण ते अपील १ ऑगस्ट २०२३ रोजी फेटाळून लावण्यात आले, असं या अहवालात सांगण्यात आलं आहे.

कर्जाचा डोंगर झाल्यामुळे नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. नितीन देसाई यांनी मृत्यूपूर्वी एक चिट्ठी लिहून ठेवली होती. यांत त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यविधी ‘एनडी स्टुडिओ’ येथेच करण्यात यावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार नितीन देसाई यांच्यावर आज ‘एनडी स्टुडिओ’ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.