सिनेमासृष्टीत बरेच असे कलाकार आहेत जे त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत विशेष काळजी घेताना दिसतात. मनोरंजन सृष्टीत काम करत असताना या कलाकार मंडळींना स्वतःच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देणं आवश्यक असत. त्यामुळे बऱ्याच कलाकारांचे सोशल मीडियावर योगा, व्यायाम करतानाचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. अशातच सिद्धार्थ चांदेकरच्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोबत सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोने सर्वांनाच चकित केलं आहे. या फोटोवरून सिद्धार्थ त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसत आहे. (siddharth chandekar Fitness)
सिद्धार्थने शेअर केलेल्या या फोटो त्याने वजन वाढलेला म्हणजेच १०३ किलो वजन असतानाचा आणि ८७ किलो वजन असतानाचा फोटो पोस्ट केला आहे, यावरून त्याने तब्बल १६ किलो वजन घटवल्याचं समोर आलं आहे. सोबतच त्याने एक व्यायाम करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे, त्याखाली त्याने पोस्ट लिहीत व्यायामाचं महत्वही पटवून सांगितलं आहे.
पाहा फिटनेसबाबत काय म्हणाला सिद्धार्थ चांदेकर (siddharth chandekar Fitness)
वाढलेलं वजन कमी करण्यासाठी त्याने कशी मेहनत घेतली याबद्दलची पोस्ट लिहिली आहे, यांत त्याने म्हटलं आहे की, “माझ्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला जानेवारी महिन्यात सुरुवात झाली. मला सुरुवातीचे काही दिवस अत्यंत कठीण गेले. जानेवारी महिन्यात मला माझ्या शरीराविषयी अजिबात आदर वाटत नव्हता. मला माझ्या फिटनेस ट्रेनरने या नकारात्मक विचारातून बाहेर काढले.”
“१०३ किलोवरून मी जवळपास १६ किलो वजन कमी करत आता ८७ किलोपर्यंत आणले आहे. एक चांगला माणूस होण्यासाठी, चांगले आयुष्य जगण्यासाठी शिस्त आणि प्रामाणिकपणा अतिशय आवश्यक आहे. मला माहिती आहे मी अजूनही व्यायामात परिपूर्ण झालेलो नाही कारण, माझा प्रवास संपलेला नसून तो नुकताच सुरु झाला आहे.” असे सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान सिद्धार्थने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट करत त्याच कौतुक केलं आहे.