Akshay Kelkar Wedding : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर नुकताच बोहोल्यावर चढला आहे. ९ मे रोजी अगदी शाही थाटामाटात अक्षय केळकरने त्याची प्रेयसी साधना काकटकरसह विवाह केला. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. बरेच दिवसांपासून अक्षयच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. त्यांच्या लग्नापुर्वीच्या तयारीचे अनेक व्हिडीओही तो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करताना दिसला. अखेर आता अक्षय व साधना हिचा विवाहसोहळा पारंपरिक अंदाजात पार पडला आहे. अशातच अक्षयने शेअर केलेल्या त्याच्या शाही विवाहसोहळ्याची झलक व्हिडीओमधून पाहायला मिळतेय.
अक्षयने लग्नातील खास व्हिडीओ शेअर करत, “फायनली… रमाक्षय” असं कॅप्शन दिलं आहे. अक्षय व साधना यांनी अगदी पारंपरिक थाटामाटात लग्नसोहळा उरकला असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. जवळचे नातेवाईक, कलाकार मंडळी आणि कुटुंबियांच्या उपस्थित दोघांनी एकमेकांना वरमाला घालत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. लग्नासाठीच्या अक्षय व साधना यांचा लूकनेही साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. अक्षय व साधना यांनी लग्नसोहळ्यात खास लूक केला होता. साधनाने गुलाबी रंगाची सुंदर साडी, हातात हिरवा चुडा, दागिने आणि नाकात नथ असा पारंपरिक लूक केला होता. तर, अक्षयने पांढऱ्या रंगाच्या शेरवानीवर बायकोच्या साडीवर मॅचिंग होईल असा बेबी पिंक रंगाचा शेला घेतला होता.
आणखी वाचा – शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर
यानंतर वरमाला घालताना दोघांचा हटके लूक पाहायला मिळाला. यावेळी अक्षयने सोहळ परिधान केलं होतं तर साधनाने गोल्डन-पांढऱ्या रंगाची सहावारी साडी नेसली होती. तर लाल रंगाचा दोघांनी मॅचिंग असा शेला घेत या लूकमध्ये भर घातलेली पाहायला मिळाली. साधनाचा सिम्पल मेकअप असलेला लूकही तिला खूप शोभून दिसत होता. मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी अक्षय-साधनाच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. सध्या या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आणखी वाचा – अपघातानंतर पवनदीपवर पुन्हा शस्त्रक्रिया, आठ तास सुरु होतं ऑपरेशन, आता परिस्थिती अशी की…
लग्नाप्रमाणेच अक्षयच्या हळदीचे, मेहंदीचे आणि ग्रहमखचे फोटोही तुफान व्हायरल झाले. अक्षय व साधना यांचा #रमाक्षय हा हॅशटॅग सध्या ट्रेंडमध्ये आहे. अक्षय प्रेमाने त्याच्या पत्नीला रमा अशी हाक मारतो. गेली दहा वर्ष ही जोडी रिलेशनशिपमध्ये आहे. आता दहा वर्षांनी अक्षय व साधनाने त्यांच्या नव्या नात्याला सुरुवात केली आहे.