‘इंडियन आयडल १२’ या शोचा विजेता आणि गायक पवनदीप राजनच्या अपघाताचं वृत्त समोर आलं. अपघाताचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पवनदीपची अवस्था पाहून चाहतेही हैराण झाले. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आज पहाटे पवनदीप कारने प्रवास करत असताना ही दुर्घटना घडली. त्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. व्हायरल व्हिडीओमध्ये पवनदीपची अवस्था पाहून सगळेच चिंता व्यक्त करत आहेत. तसेच त्याला बरीच दुखापत झाली असल्याचं समोर आलं आहे. पण ही घटना नक्की कशी घडली? हे आता समोर आलं आहे. (indian idol 12 winner pawandeep rajan accident)
पवनदीपचा अपघात कसा झाला?
पवनदीपचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. ड्राइव्ह करत असताना ड्रायव्हरला डुलकी लागली. म्हणूनच हा अपघात झाला असल्याचं काही रिपोर्ट्सनुसार समोर आलं आहे. पण अद्यापही पवनदीपची टीम वा कुटुंबियांनी याबाबत कोणतीच अधिकृत माहिती दिली नाही. नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, पवनदीपच्या कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या पुढील भागाचा चक्काचुरच झाला. कार जागीच थांबली. कारमध्ये बसलेल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.
आणखी वाचा – Video : ‘इंडियन आयडल १२’चा विजेता पवनदीप राजनचा भीषण अपघात, गायकाची रुग्णालयातील अवस्था पाहून ओळखणंही कठीण
दोन मित्र बरोबर होते आणि…
यावेळी प्रवास करताना पवनदीपबरोबर त्याचे दोन मित्रही होते. अपघातामध्ये त्याच्या दोन्ही मित्रांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर जवळच्या रुग्णालयात दोघांनाही लगेचच नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना दिल्लीला पाठवण्यात आलं. पवनदीपच्या दोन्ही हातांना मोठी दुखापत झाली आहे. सध्यातरी दिल्लीमधील रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हा अपघात अमरोहा जिल्ह्यातील नॅशनल हायवे-९ पहाटेच्या सुमारास झाला. पवनदीप लवकरात लवकर ठिक व्हावा म्हणून चाहते देवाकडे प्रार्थना करत आहेत.
पवनदीप उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यामध्ये राहतो. त्याचे वडील सुरेश राजन, आई सरोज राजन, बहीण ज्योतिदीप राजन तिघेही कलाक्षेत्रात काम करतात. ‘द वॉईस ऑफ इंडिया’ शोमधून पवनदीपच्या करिअरला नवी कलाटणी मिळाली. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘इंडियन आयडल १२’ शोचं विजेतपद पटकावलं. या शोनंतर त्याला अनेक गायनाचे कार्यक्रमही मिळत गेले. देशभरात पवनदीपला त्याच्या नावाने ओळखलं जातं. त्याने गायलेल्या गाण्यांचे लाखो चाहते आहेत. पवनदीपला अशा अवस्थेत पाहून चाहते दुःख व्यक्त करत आहेत.