पहलगाम हल्लाचं भीषण वास्तव हळूहळू समोर येत आहे. सुंदरतेने नटलेल्या जागेत पर्यटक मनसोक्त बागडत असताना झालेला गोळीबार भारतीयांना आयुष्यभराची जखम देऊन गेला. या भ्याड हल्ल्यात २६ जणांनी आपला जीव गमावला. त्यांचे कुटुंबिय, नातेवाईक, मित्र-परिवार अजूनही सुन्न आहे. हल्ल्यादरम्यान तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांनी आपापला जीव वाचवण्यासाठी जमेल तितके प्रयत्न केले. मात्र नराधमांना ना दया होती ना माणूसकी. एका जोडप्याचं तर दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. पहलगाममध्ये बसून हे जोडपं सुखी संसाराचं स्वप्न रंगवत होतं. अशातच गोळीबार झाला आणि त्या महिलेच्या पतीला आपला जीव गमवावा लागला. शुभम द्विवेदी व त्याची पत्नी एशान्याची ही हृदय पिळवटून टाकणारी कहाणी आहे. (pahalgam terror attack)
मॅगी खाताना धर्म विचारला तेव्हा…
शुभम व एशान्याचं फेब्रुवारीमध्ये थाटामाटात लग्न झालं होतं. अवघ्या दोन महिन्यांमध्येच या नवविवाहित जोडप्याचा संसार अर्ध्यावरतीच मोडला. हनिमूनसाठी म्हणून आलेलं हे जोडपं आयुष्यभरासाठी वेगळं झालं. दुःख आभाळापेक्षाही मोठं. तिचं मन काय काय बोलत असेल हे विचार न करण्यासारखंच… पहलगाममध्ये फिरत असताना दोघांनीही काहीतरी नाश्ता करण्याचं ठरवलं. त्याचप्रमाणे दोघं खात होते. अचानक तुमचा धर्म काय? असं एकाने विचारलं.
काही कळायच्या आतच गोळीबार
एशान्याला तर काय सुरु आहे हेच कळेना. तिने मागे वळून हसतंही विचारलं की, “भाई नक्की काय झालं आहे?”. पुन्हा धर्म विचारु लागला म्हणून हिंदू असं त्यांनी उत्तर दिलं. काही कळायच्या आतच त्यांनी शुभमला गोळ्या झाडल्या. एशान्याने डोळ्यांसमोर आपल्या पतीचा मृत्यू पाहिला. मलाही मारा म्हणून ती जोरजोरात रडत होती. त्यांच्याकडे मरण मागत होती. मात्र “तुला मोदीला हे सगळं सांगायला जिवंत ठेवलं आहे” असं दहशतवाद्यांकडून सांगण्यात आलं. काय ती राक्षसीवृत्ती. माणसांमधला राक्षसाच एशान्याने तेव्हा पाहिला.
नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याचं शर्ट घालून…
नवविवाहित एशान्याला जोडीदार गेल्याचं सत्य पचेना. पतीचा मृत्यू स्वतःच्या डोळ्यांनी पाहताना तिच्या मनात किती हजारो प्रश्न निर्माण झाले असतील हे शब्दात मांडणं कठीण. पत्नीचं वेडं प्रेम म्हणून की काय तिने तब्बल दोन दिवस शुभमचा शर्ट घातला. शुभमचं पार्थिव जेव्हा आलं तेव्हा ती तिथेच शेजारी बसली. शर्ट काढताना ढसाढसा रडली. तिचं अश्रूंनी भरलेलं आभाळ तेव्हा दाटून आलं आणि एशान्याने एकच हंबरडा फोडला.
शुभम मॅगी खात असतानाच हा संपूर्ण प्रकार घडला. पहिला हल्ला शुभमवरच झाला असं एशान्याचं म्हणणं आहे. या हल्ल्यादरम्यान तिची बहिणही तिथेच होती. शिवाय एशान्याचे वडील वॉशरुमसाठी गेले होते. शिवाय ती आता पतीसाठी लढत आहे. शुभमला शहीदचा दर्जा देण्याची मागणी एशान्या करत आहे. इतकंच नव्हे तर हे क्रुर कृत्य करणाऱ्यांनाही धर्म विचारुनच संपवा अशी मागणी तिने सरकारकडे केली आहे.