Meenal Shah Wedding : सध्या मराठी सिनेविश्वात लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. अभिनेत्री दिव्या पुगांवकरने नुकतीच लग्नगाठ बांधली. तर ‘बिग बॉस’ फेम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरनेही अगदी शाही थाटामाटात लग्नगाठ बांधली. यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने लग्न केलं असल्याचं समोर आलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ फेम मीनल शाह. मीनलने थेट लग्नाचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. मीनलने गोव्यात हे लग्न पार पाडलं असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच मीनलने गोव्यात स्वतःच हक्काचं घर घेतलं. यामुळे ती चर्चेत आली होती.
यानंतर आता मीनलने लग्न करत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. मीनलने तथागत पुरुषोत्तम यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. तथागत यांच्या इंस्टाग्राम बायोवरुन तो उद्योजक असल्याचं दिसतंय. शिवाय अभिनेत्रीच्या नवऱ्याला ट्रॅव्हलिंग, डायव्हिंग हे छंद असल्याचंही बायोवरुन कळतंय. मीनलने कुटुंबीय तसेच जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत अगदी खासगी पद्धतीने हा विवाह केला.
लग्नासाठी अभिनेत्री खूपच सुंदर तयार झाली होती. पिवळ्या रंगाची नऊवारी साडी त्यावर लाल रंगाचा ब्लाऊज परिधान करत मीनल नवरी मुलीच्या वेशात खूप खास दिसत होती. तर तथागतने मोती-सोनेरी रंगाची शेरवानी परिधान केली होती. समोर आलेल्या फोटोंवरुन तरी या जोडीचे लग्न महाराष्ट्रीय पद्धतीने पार पडल्याचे दिसते. ‘आय लव्ह यू तथागत. आमच्या प्रियजनांकडून मिळालेल्या सर्व प्रेम आणि आशीर्वादांबद्दल धन्यवाद. माझ्याकडे खूप काही सांगण्यासारखे आहे, पण ही भावना मी शब्दात व्यक्त करु शकत नाही’, असे कॅप्शन देत मीनलने ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे.
आणखी वाचा – सपना चौधरी तिसऱ्यांदा आई होणार?, म्हणाली, “नवरा आहे म्हणूनच…”
काहीच दिवसांपूर्वी मीनल तिच्या गोव्यातील घरामुळे चर्चेत आली होती. तिने गोव्यात अलिशान बंगला बांधून तिचं एक स्वप्न पूर्ण केलं. गेल्यावर्षी धनत्रयोदशीच्यादिवशी तिने तिच्या गोव्याच्या ड्रीम हाऊसमध्ये गृहप्रवेश केला होता. आता गोव्यामध्येच तिने लग्नगाठ बांधून आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.