Sharayu Sonawane and Jayant Lade Lovestory : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या मालिकेने प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली आहे. या मालिकेत एकामागोमाग एक रंजक ट्विस्ट येत आहेत. मालिकेत शरयू सोनावणे पारू ही मुख्य भूमिका साकारत आहे. पारू या भूमिकेमुळे शरयूला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. शरयू तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. शरयूने थेट लग्न झाल्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. यामुळे शरयू व जयंत यांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. शरयू सोनावणेने २०२३मध्ये जयंत लाडेशी लग्नगाठ बांधली. हे लग्न तिने वर्षभर सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी तिने लग्न झाल्याचं जाहीर केलं. तेव्हापासून ती सातत्याने नवऱ्याबरोबर फोटो शेअर करत असते.
अशातच व्हॅलेंटाईन डेनिमित्त ‘इट्स मज्जा’ने शरयू व जयंत यांचा खास इंटरव्ह्यू घेतला. यावेळी शरयू व जयंतने त्यांची लव्हस्टोरी, आवडी-निवडी, संसार याबाबत अनेक गप्पा मारल्या. यावेळी लव्हस्टोरीबाबत बोलताना शरयू म्हणाली, “आमची भेट ही सेटवरच झाली आहे. मी ज्या चित्रपटात काम करत होते त्याची निर्मिती जयंतने केली होती. त्यामुळे सेटवर आमच्यात फार कमी बोलणं व्हायचं. सुरुवातीला तर जयंत माझ्याकडे पाहायचा देखील नाही, कारण तो कामाच्या बाबतीत खूप प्रोफेशनल आहे त्यामुळे सेटवर तो आणि त्याच काम इतकंच असायचं. अधूनमधून काही कामानिमित्त आमचं बोलणं व्हायचं. जेव्हा माझ्या कुटुंबाचे काही प्रॉब्लेम्स सुरु होते तेव्हा जयंतने मला खूप मदत केली, आणि त्यातून बाहेर काढलं. यानंतर आमचं बोलणं सुरु झालं”.
आणखी वाचा – Video : ‘आई कुठे…’ फेम रुपाली भोसलेच्या आईने सुरु केला नवा व्यवसाय, जेवणाच्या ऑर्डर व तयारीसाठी लेकीची मदत
जयंत म्हणाला की, “सुरुवातीला मी सेटवर ओळखायचो पण आमचं बोलणं व्हायचं नाही. जेव्हा आम्ही बोलायला लागलो, एकत्र बाहेर भेटू लागलो तेव्हा आपसूक आमच्यातील मैत्री पुढे सरकली. आम्ही एकमेकांना कधी प्रपोज केलं नाही, पण एकत्र बोलताना, फिरताना, ट्रेकला जाताना आमचं आम्हाला कळू लागलं की आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. जेव्हा माझ्या लग्नाबाबत घरी बोलायला लागले तेव्हा मी शरयूबाबत सांगितलं. त्यांनाही हे ऐकून धक्का बसला. मात्र त्यांची मी समजूत काढली आणि जेव्हा शरयू घरी भेटायला आली तेव्हा शरयूने या बिलकुल दाखवलं नाही की ती पहिल्यांदाच माझ्या घरी आली आहे. आणि तिने पहिल्याच भेटीत सगळ्यांची मनं जिंकली”.
शरयू यावेळी म्हणाली की, “माझ्या घरी याला आधीपासून ओळखत होते, पण जेव्हा आम्ही लग्नाचं बोललो तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. आणि सुरुवातीला त्यांनी विरोधही केला पण मी मागे हटणार नाही यावर ठाम होते त्यामुळे गोष्टी पुढे सरकल्या”. शरयू सोनावणेचा नवरा जयंत लाडे मराठी सिनेसृष्टीत काम करत असून तो निर्माता आहे.