मनोरंजन क्षेत्रातील चकाचकपणा आणि व्यावसायिकता यात दीर्घकालीन वाटचाल करीत असतानाही आपल्यावरचे संस्कार, आपली मूल्ये, परंपरा, सभ्यता जपण्यात यशस्वी ठरलेले कलाकार म्हणजे जयंत सावरकर. आज २४ जुलै रोजी त्यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त समजताच माझी त्यांच्याबाबत अशीच भावना झाली. आज बातमी मात्र अनपेक्षित आली आणि धक्कादायक ठरली. कलेशी निष्ठा आणि सामाजिक सांस्कृतिक बांधिलकी असलेले तसेच अजूनपर्यंत अभिनय क्षेत्रात वावरत असलेले असे ते अभिनेते होते. मराठी रंगभूमी, मराठी व हिंदी चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि आकाशवाणी असा विविध क्षेत्रात त्यांचा वावर होता आणि त्या प्रत्येक माध्यमाची कार्यशैली, भाषा, संस्कृती याचा अभ्यास व स्वीकार करीत त्यांनी आपली वाटचाल केली हे विशेष.(jayant savarkar passed away)
जयंत सावरकर यांचा जन्म कोकणातील गुहागर येथील ३ मे. १९३६चा आहे . कोकणातून अनेक जण फार पूर्वीपासूनच बोटीने प्रवास करत मुंबईत नोकरीसाठी येत. तसेच जयंत सावरकर आले. वयाच्या विसाव्या वर्षापासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली, ती पुढे अजूनपर्यंत वर्षे चालूच राहिली दर दोन तीन दिवसांनी कुठल्या न कुठल्या नाटकात ते रंगभूमीवर दिसतच होते. त्याबाबत त्यांनी कायमच सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आणि एक प्रकारचा आदर्श पुढील पिढीसमोर ठेवला. एखाद्या चित्रपटात भूमिका साकारत. त्यांचे वडील लहानमोठा व्यवसाय करायचे. सकाळी चार वाजता उठून रोज चरकातून उसाचा हंडाभर रस काढून ते चालत चालत आरे गावापर्यंत जाऊन विकायचे. जयंत सावरकर सर्वात धाकटे. त्यांचा मोठा भाऊ मुंबईत नोकरी करत होता, त्याच्याकडे जयंत सावरकरांना पाठवले. ते त्याच्याबरोबर गिरगावात राहू लागले व नोकरी करु लागले.
आणि मुंबईमध्ये सुरु झाला जीवन प्रवास(jayant savarkar movies)
गिरगावातील शेजारधर्म, चाळ संस्कृती, सण संस्कृतीत ते वाढल्याचा त्यांना विशेष आनंद असे. कालांतराने ते ठाणे शहरात राहायला गेले.नोकरी सोडून जयंत सावरकर यांनी पूर्णपणे नाटकातच काम करायचे जेव्हा ठरविले तेव्हा त्यांचे सासरे नटवर्य मामा पेंडसे यांनी नोकरी सोडण्याला विरोध केला, पण अभिनयाच्या कामासाठी पूर्ण पाठिंबा दिला. सावरकरांनी सासरेबुवांचा सल्ला मानला आणि श्रद्धा व निष्ठेने रंगभूमीची सेवा सुरू केली. सुरुवातीची बारा वर्षे सावरकर यांनी ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम केले. त्याच वेळी ते नोकरीही करत होते. नाटकाची आवड होतीच. हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी सुरुवातीला लहानसहान कामे केली.

मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक, कार्यकर्ता म्हणूनही काही काळ काम केले. पुढे साहित्य संघाच्या नाट्य शाखेत त्यांचा प्रवेश झाला. साहित्य संघात होणाऱ्या सर्व नाटकांच्या प्रयोगांना त्यांची हजेरी असायची. साहित्य संघाच्या दरवाज्यावर उभे राहून ते तिकिटे कापत. आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘किंग लिअर’ (सम्राट सिंह) या नाटकात त्यांना मा. दत्ताराम यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. नाटक फारसे चालले नसले तरी त्यांनी साकारलेल्या ‘विदूषक’ या भूमिकेचे कौतुक झाले.
कमलाकर सारंग, दामू केंकरे, भालचंद्र पेंढारकर या जुन्या दिग्दर्शकांबरोबर कामे केल्यानंतर अद्वैत दादरकर, चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम, अशा नव्या पिढीतल्या दिग्दर्शकांबरोबरही त्यांनी कामे केली आहेत. काळासोबत बदलत राहणे त्यांनी स्वीकारले याचा खास उल्लेख हवाच.जयंत सावरकर यांनी शंभरहून अधिक मराठी आणि तीसहून अधिक हिंदी चित्रपटांत कामे केली आहेत. वयाच्या पंचाहत्तरीनंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत कामे करायला सुरुवात केली.
जयंत सावरकर यांची भूमिका असलेली काही नाटके अशी,अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे), अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष), अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या), अवध्य (नाचणे),आम्ही जगतो बेफाम (चिवटे), एकच प्याला (तळीराम), एक हट्टी मुलगी (गृहस्थ)ओ वुमनिया, कळलाव्या कांद्याची कहाणी (कारभारी; मंगळ्या) के दिल अभी भरा नही इत्यादी अनेक.
नाटक आणि नोकरी(jayant savarkar)
नाटकाचे प्रयोग आणि दौरे सांभाळत आणि निर्माता व दिग्दर्शक यांना सहकार्य करत त्यांनी गडबड गोंधळ, बिस्किट, येड्यांची जत्रा, व्यक्ती आणि वल्ली, जावई माझा भला इत्यादी मराठी तसेच तेरा मेरा साथ रहे, वास्तव, सिंघम, बडे दिलवाला, कुरुक्षेत्र, गुलाम ए मुस्तफा इत्यादी हिंदी चित्रपटातून लहान मोठ्या भूमिका साकारल्या. या वाटचालीत त्यांनी आपला सहकार्य करण्याचा मूळ स्वभाव कायम ठेवला, त्यामुळे ते पाच पिढ्यातील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासोबत त्यांचे चांगले सूर जुळले.

या प्रवासात त्यांना अनेक मान्यवर पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या पुरस्कारांचा त्यांनी कायमच नम्रपणे स्वीकार केला.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, डॉ. गो. खांडेकर स्मृती पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ‘एक छोटा माणूस’ हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले आहे. त्यात त्यांच्या एकूणच जीवन प्रवासाचा प्रत्यय आणि त्यांचा अंतर्मुखपणा याची सकारात्मकता त्यात दिसते. शीर्षकापासूनच त्याचा प्रत्यय येतो. ते बोलके आहे. जयंत सावरकर यांना विष्णुदास भावे पुरस्कारही मिळाला होता. जयंत सावरकर हे ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
मनाने खूपच मोठे असलेल्या या गुणी कलाकाराला श्रध्दांजली.(jayant savarkar passed away)
दिलीप ठाकूर